गणेश सावंत
मो. नं. 9422742810
गांधी नावाच्या अहिंसेच्या वीराची आज जयंती ज्या देशाला जगभरात गांधींचा देश म्हणून ओळखले जाते त्या देशात गांधींचे महत्व किती ?गांधींना शिव्याशाप देणे ,त्यांच्या पुतळ्याला गोळ्या घालणे आणि आपल्या द्वेषाची खाज मिटवणे एवढ्या साठीच गांधी उरले आहेत का?जगभरच्या विद्यापीठांत गांधी हे एक राजकीय विचारवंत म्हणून अभ्यासले जात असताना भारतीय भाषांमध्ये गांधींविषयीचा अर्वाच्य मजकूर व्हॉट्सअॅप विद्यापीठातून पसरविला का जातो?, हे व्हॉट्सअॅप नव्हते तेव्हा काही सवंग ‘गांधी-विनोद’ शाळकरी विद्यार्थ्यांनाही माहीत असत, हे आपण जगाला कसे काय सांगणार? किंवा आपल्या शेजारी देशाच्या द्वेषाखेरीज आपल्याला स्वदेशाचा अभिमान असू शकत नाही, हे मान्य करूनच आपण गांधी आणि फाळणी याविषयी बोलतो वा ऐकतो, याची कबुली कोणत्या जाहीर व्यासपीठावरून देणार? गांधीजींच्या मारेकर्याची जाहीर भलामण करणारे संसदेत जातात, त्यांना ‘माफ नही करूंगा’ म्हणणारे पंतप्रधान नेमके याबाबत क्षमाशील राहतात, पाकिस्तान हे गांधींचे पाप आणि स्वच्छ भारत हे महात्माजींचे ‘सत्तर साल अधूरे’ राहिलेले स्वप्न, हि नवटंकी नाही का असे एक ना अनेक प्रश्न पाडण्याचे कारण एवढेच आम्ही जित्याजागत्या मानवताधर्मवाद्याना लपवत देवांना प्रचारात उतरवत आहोत.
कोण होते गांधी
आम्ही नेहमी म्हणतो सत्याचे आणि अहिंसेचे पुजारी होते गांधी. सुपासारखे कान, मोठे डोके,दिसायला कुरूप,सडपातळ असणारा हा अहिंसेचा योद्धा दोनशे वर्ष राज्य करणार्या पांडारतोंड्या इंग्रजावर भारी पडला अन या देशाला स्वातंत्र्याचा स्वास मिळवून दिला मोहनदास करमचंद गांधी या माणसाने पोरबंदरमध्ये सुस्थितीतील कुटुंबात जन्म घेतला, त्याला आज दीडशे वर्षे लोटली. पण एवढा काळ लोटूनही गांधी आजही जिवंत आहेत आणि पुढची दीडशे वर्षेच नव्हे, तर जोपावेतो या धरतीवर माणूस नावाचा प्राणी अस्तित्वात असेल, तोपावेतो ते आपल्याला विसरता येणार नाहीत. गांधींचे जेवढे ‘भक्त’ आहेत, तेवढे अन्य कोणाचेही असणे शक्य नाही आणि त्यापलीकडची बाब म्हणजे या ‘भक्तां’च्या संख्येप्रमाणेच त्यांच्या ‘शत्रूं’ची संख्याही भलीमोठी आहे! शाळकरी वयातच नव्हे, तर महाविद्यालयात गेल्यावरही हा एक सर्वसामान्य माणूसच होता आणि सर्वसामान्य माणूस त्या वयात जे काही करतो ते सर्व काही त्याने केले होते. पुढे रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेली ‘महात्मा’ ही उपाधी त्याच्या मागे आयुष्यभरासाठी चिकटल्यानंतरही आपण तरुणपणी कसे स्खलनशील होतो, ते जाहीरपणे सांगण्याचे धैर्य त्याच्यात होते. गांधींचे माहात्म्य ते हेच! हे आजच्या लोहपुरुष तर कधी सिजनवाईज बिरुदावली लावणार्या तथाकथिताना काय समजणार. दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर त्यांच्या मागे ही उपाधी लागली खरी; पण त्यांना विरोधही काही कमी झाला नाही. त्यांच्या हयातीत आणि नंतरही त्यांना, त्यांच्या विचारांना तिखट विरोध झाला; परंतु ना हत्या करून गांधींना संपवता आले, ना त्यांना विरोध करून. उलट काळ जसा पुढे जात आहे, तसतसे गांधीविचारांचे आकर्षण वाढत आहे, जे जगाला हवे ते गांधी विचारात आहे हे आजच्या नारुणाईला समजत आहे . गांधी कोण भुरटा शासक नाही गांधी विचार अहिंसा आणि सत्याचा पुरस्कार करणारा आहे . तो जुम्ब्लेबाज आणि आश्वासन खोर तर नक्कीच नाही . भलेही या माणसाची
काळा माणूस
म्हणून अवहेलना झाली . गोर्या ब्रिटिश अधिकार्याने या माणसाला भलेही सामानासागाट रेल्वेगाडीतून फेकून दिले . हि अवहेलना आमच्या साठी गरजेची वाटते . कारण इथेच आम्हाला हा अहिंसेचा आणि सत्याचा योद्धा मिळाला . जेंव्हा गांधी भारतात परतले तेंव्हा त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य चळवळ उभा केली या चळवळीला वेगळ्याच चैतन्याने भारून टाकले. जनजागृतीचे लोण पार गाडीवस्ती तांडा गावागावात आणि पाड्यांपर्यंत पोचले. बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याला आपल्या अहिंसक विरोधाची दखल घ्यायला त्यांनी भाग पाडले. सविनय कायदेभंग, सत्याग्रह ही नवी अस्त्रे जनतेच्या हातात आली. त्याआधी काँग्रेस ही चर्चा-परिसंवाद, बैठकी, निषेधपत्रे यापुरतीच मर्यादित होती आणि पक्षावर प्रामुख्याने मोजक्या उच्चभ्रू लोकांचा पगडा होता. गांधी यांच्या हाती संघटनेची धुरा येताच देशभरातील उपेक्षित, पददलित अशा आम आदमीपर्यंत त्यांनी ती पोचवली. स्वातंत्र्य चळवळीला देशव्यापी स्वरूप प्राप्त करून दिले. ‘सोशल मीडिया’ नावाची चीज अस्तित्वात नसतानाही देशभरातील जनताच नव्हे, तर अनेक विचारी नेते त्यांच्यामागून आपोआप चालू लागले. ही ताकद अद्भुत आहे. केवळ भारतातच नाही, तर जगात जिथेजिथे शासनसंस्थांकडून दमन आहे, नागरी स्वातंत्र्याचा संकोच आहे, पिळवणूक आहे, तिथे तिथे हा महात्मा आधार देण्यासाठी, अन्यायाला विरोध करण्यासाठी आजही ‘उपस्थित’ आहे. युद्धखोरी, शस्त्रास्त्रस्पर्धेपासून ते जागतिक हवामानबदलांपर्यंत आणि दारिद्य्रापासून ते विषमतेपर्यंत ज्या ज्या समस्यांनी जगाला ग्रासले आहे, त्या प्रत्येक समस्येच्या बाबतीत गांधी काही ना काही सांगू पाहतात. त्यामुळेच ‘मानवताधर्मा’चा विसाव्या शतकातील सर्वांत प्रभावी उपासक कोण असेल तर तो गांधी. हे कोणीच नाकारू शकणार नाही आणि जो नाकारत असेल त्याला त्याची आत्मा वैचारिक बलात्कारी म्हणून त्यालाच हिणवत असेल.
गांधींची अहिंसा नेभळ्यांची नव्हती
नवाकाळकार खाडिलकर फाळणीवर भाष्य करताना म्हणतात महात्मा गांधी इतर सर्व काँग्रेस नेत्यांपेक्षा फार फार वेगळे नेते होते . जर शक्य असते तर इतर सर्व नेत्यांनी त्यांना केव्हाच गुंडाळले असते ! महात्माजींचा फाळणीला अखेरपर्यंत कडवा विरोध होता . पण त्यांचा विरोध गुंडाळून ठेवूनच अन्य काँग्रेस नेत्यांनी फाळणी मान्य केली ना ! भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी नवीन मंत्रिमंडळ बनविले . सरदार वल्लभभाई पटेल देशाचे उपपंतप्रधान झाले . ते भारताचे पहिले पोलादी गृहमंत्री म्हणून इतिहासात विख्यात आहेत . त्यांनी 650 संस्थानांचे विलीनीकरण केले . डॉ . बाबुजी राजेंद्रप्रसाद पहिले राष्ट्रपती झाले . अखेर देशाची फाळणी केल्यानंतर जेव्हा सत्तेचे वाटप सुरू झाले तेव्हा महात्माजीनी राजकारणातून अंग काढून घेतले . वास्तविक सत्तेच्या वाटपात सर्वात अग्रस्थान महात्माजींचे होते . पण कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी त्यांच्या कवितेत नेमके विचारले आहे की , ’ जयाच्या क्षणी कुठे हो तो ? महात्माजी सत्तेसाठी नव्हते . सेवेसाठी होते ! स्वातंत्र्याचे ध्येय साकार होताच ते दंगली होऊ नयेत यासाठी कलकत्याला गेले ! महात्माजी पूर्वीच म्हणाले होते की , स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माझे काम दिल्लीत नाही . जनतेत आहे . त्यानुसार ते जातीय दंगलीने उध्वस्त झालेल्या लोकांसाठी धांवले . ते अत्यंत प्रक्षोभ असलेल्या कलकत्त्यात शांततेसाठी प्रयत्न करीत राहिले . मेला असतास तर अभिमान वाटला असता महात्माजी यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असे की , ते आयुष्यभर कोणतेही पोलीस संरक्षण न घेता फिरले . जनतेत कमालीचा प्रक्षोभ असताना ते एकटेच फिरत राहिले . त्यांची याबाबतची मते प्रसिद्ध आहेत . ही मते एका गोष्टीत प्रकर्षाने प्रगट झाली . एकदा मुंबईत हिंदू- मुस्लिम दंगल झाली . त्यावेळी एके ठिकाणी तेव्हाचे आरपार प्रामाणिक नेते साथी एस . एम . जोशी यांनी रस्त्यात जाऊन एका मुस्लिमाला संतप्त तरुणांपासून वाचविले . त्याची खूप प्रसिद्धी झाली . मोरारजी दंगलीच्या ठिकाणी पूर्ण बंदोबस्तात गेले आणि त्यांनी लोकांना सलोख्याने राहाण्याचे आवाहन केले . महात्मा गांधींना त्यांनी सांगितले की , मी शांतीचे वारंवार आवाहन केले . पोलिसांना शांतता कमिट्या नेमण्यास बजावले . ’ यावर चरख्यावर सूत कातत असतानाच महात्माजीनी मोरारजीना विचारले , ’ तू स्वत : का दंगलीच्या ठिकाणी गेला नाहीस ? ’ मोरारजी- मला ठार मारले असते तर महात्माजी- तू दंगल थांबवायला गेला असतास आणि त्या प्रक्षोभात ठार झाला असतास तर मला तुझा अभिमान वाटला असता !! ’ सत्याग्रहा’ने कपटी ब्रिटिश हताश झाले महात्माजी यांची अहिंसा नेभळ्याची नव्हती . ती जितकी शूर होती तितकीच व्यावहारिक होती .