बीड (रिपोर्टर)ः- पावसाळा तोंडावर आला असून शहरात मान्सुन पुर्व स्वच्छता करावी, मोठे नाले साफ करावे, गल्ली बोळात घंटा गाड्या पाठवून दररोज कचरा संकलन करावे, वेळेवर पाणी पुरवठा करावा, मुख्य पाईपलाईनसह घरातील छोटे मोठे नळ दुरूस्त करावेत यासह विविध विकास कामे शहरात तात्काळ राबवावी अशा मागणीचे निवेदन डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह नगरसेवकांनी बीडचे मुख्याधिकारी यांच्याकडे दिले आहेत.
बीड शहरात मान्सुनपुर्व स्वच्छता करुन रखडलेले विविध कामे तात्काळ करावेत अशी मागणीचे निवेदन घेवून डॉ.योगेश क्षीरसागर, मोईन मास्टर, फारुख पटेल, सादेकअली शेख महेबुब अली, एकबाल शेख निसार अहेमद, गणेश वाघमारे, जलील खान पठाण, विकास जोगदंड, प्रभाकर पोपळे, विनोद मुळूक, रविंद्र कदम, रंजित बनसोडे, शुभम धूत, प्रेम चांदणे, विलास विधाते यांच्यासह नगर सेवक यांनी बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. त्या निवेदनात विविध विकास कामे पुर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करावे, मान्सुन पुर्व शहरातील प्रमुख मोठे नाले स्वच्छ करावे, नियमीत वेळेवर अथवा ठरल्या वेळेप्रमाणे पाणी पुरवठा करावा, मुख्य पाईपलाईनचे लिकेज काढावेत, यशंवतराव चव्हाण नाटयगृह रितसर चालविणे व दुरूस्ती करावी, छत्रपती संभाजी महाराज क्रिंडागण देखभालीसाठी देण्यात यावे, सार्वजनीक बांधकाम विभाग बीड मार्फत मंजूर असलेली कामे लवकर पुर्ण करावी, महात्मा फुले भाजी मार्केटमधील ओट्यांचा लिलाव करावा, फिश मार्केट बुंदेलपूरा याचा लिलाव करावा, पावसाळ्यातील उपाय योजनाम्हणून नालीमधील घरगुती नळाचे लिकेज शोधून ते बंद करुन रोगराई होवू नये म्हणून प्रतिबंध करावे, बंद घंटा गाड्या सुरू करुन गल्लोगल्ली कचरा संकलन करावे, भुयारी गटार योजनेच्या एसटीपी साठीची जागा उपलब्ध करुन दयावी, विविध ओपन स्पेसवर गार्डन निर्माण करावे, शहरातील साचलेल्या पाण्यात डास निर्माण होण्यास प्रतिबंध करावे, बंद पथदिवे दुरूस्त करुन नविन पथदिवे बसविण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले.