गंभीर जखमी असलेल्या वृद्धावर औरंगाबादेत उपचार सुरू
बीड (रिपोर्टर) जमीन नावची करून दे, असे म्हणत शेतात झोपलेल्या 65 वर्षीय वडिलाच्या डोक्यात स्टीलची बादली घालत नंतर मोठा दगड मारून गंभीर जखमी केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे घडली. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून जखमीवर औरंगाबादेत उपचार सुरू आहेत.
राजूबाई शाहू शिंदे (वय 65 वर्षे) यांनी माजलगाव ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिला 4 मुले असून ते सर्व कामानिमित्त मुंबईला राहतात. त्यातील लहान मुलगा संतोष हा गेल्या चार दिवसांपूर्वी गावाला आला आहे. तेव्हापासून तो गावात राहत होता. दि. 5 जून रोजी संध्याकाळी सहा वाजता त्याचे वडिल शाहू शिंदे हे डुब्बा गाव रोडवरील त्यांच्या शेतात झोपण्यासाठी गेले होते. या दरम्यान रात्री आठ वाजता संतोष त्यांच्या जवळ गेला आणि माझी शेती नावे करून द्या, असे म्हणत बापाच्या डोक्यात स्टीलची बकेट मारून डोक्यात दगड टाकला आणि घराकडे निघाला. वाटेत त्याची आई राजूबाई शाहू शिंदे या भेटल्या. त्यांना मुलगा म्हणाला की, तुझ्या नवर्याच्या डोक्यात दगड टाकला आहे, तो मेला की काय जावून बघ, असे म्हटल्यानंतर राजूबाईन पतीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तालखेड ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबादला पाठवण्यात आले आहे.