पाटोदा (रिपोर्टर)- ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ते ज्ञान सर्वसामान्यातील सर्वसामान्य मुलांना मिळायलाच पाहिजे या उदात्त हेतुतून एका छोट्याशा झोपडीत गुरुकुल नावाचं विद्यादान काढून गेल्या दीड दशकात हजारो कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळे, ऊसतोड कामगार यांच्या मुलांना गुरुकुलमध्ये ज्ञानदान करणारे गुरुकुलचे संस्थापक सुदाम भोंडवे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चौघांचा काल दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या पार्थीवदेहावर आज सकाळी शोकाकूल वातावरणात डोमरी येथील सोनदरा गुरुकुलमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रातील नागरिक साश्रू नयनांनी अंत्यविधीला उपस्थित होते.
काल एका कार्यक्रमानिमित्त गुरुकुलचे संस्थापक सुदाम भोंडवे हे आपल्या कुटुंबासमवेत चाकणकडे निघाले होते. काल दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास फुलके मळ्याजवळ त्यांची इंडिका (क्र. एम.एच. 12 ई.एम. 2978) या गाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये सुदाम भोंडवे, त्यांच्या पत्नी सिंधूताई भोंडवे, सुन कार्तिकी भोंडवे आणि चार वर्षाची नात आनंदी भोंडवे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य एकजण यात गंभीर जखमी आहे. भोंडवे कुटुंबियावर काळाने घाला घातल्याचे वृत्त कळताच पाटोदा तालुक्यासह जिल्हाभरात शोककळा पसरली. गेल्या दीड दशकामध्ये सुदाम भोंडवे यांनी लोककल्याणकारी ज्ञानदानासारखे पवित्र काम केले. या दीड दशकात गुरुकुलच्या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. त्यांचे भविष्य घडविले. ज्ञानावर सर्वांचा अधिकार आहे ते ज्ञान गरीबातल्या गरीब मुलाला मिळावं या उद्देशाने त्यांनी एका झोपडीतून गुरुकुल उभारले. त्याचे आज वटवृक्ष झाले. स्वत: समाजासाठी दानत्वाची दानत ठेवणार्या सुदाम भोंडवेंसह त्यांच्या कुटुंबियावर काळाने घातलेला घाला हा सर्वसामान्यांना पचत नाही मात्र दुर्दैवाने या भोंडवे कुटुंबियावर आज सोनदरा गुरुकुलमध्ये अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. आज सकाळी सोनदरा गुरुकुलमध्ये दातृत्वाचा पिता सुदाम भोंडवे यांच्यासह त्यांच्या पत्नी, सुन आणि नातीवर साश्रूनयनांनी अंत्यसंस्कार झाले. या वेळी पाटोदा तालुक्यासह जिल्हाभरातून अनेक लोक उपस्थित होते.