21 कोटींच्या जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपुजन
सिरसाळा (रिपोर्टर) ग्रामपंचायत कोणाचीही असो, विकास मात्र माझ्या हातून होणार असल्याचे सांगत सिरसाळा येथील जनतेचे प्रत्येक स्वप्न पुर्ण करणार आहे, 2019 च्या निवडणुकीत दिलेला प्रत्येक शब्द आता प्रत्यक्षात कामे करून पुर्ण करत असल्याचे सांगून येथे लवकरच दोन मोठे प्रकल्प आणणार असल्याचे सांगून सिरसाळ्यासाठी एमआयडीसी उभा करून सिरसाळा नावापरुपाला आणणे हे माझे स्वप्न असल्याचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडेंनी सांगून परळीप्रमाणेच सिरसाळ्याचा विकास होईल, हा माझा शब्द असल्याचे म्हटले.
ते जलजीवन मिशनअंतर्गत 21 कोटी 97 लाख रुपयांच्या सिरसाळा येथील पाणीपुरवठा योजना भूमिपुजन समारंभ प्रसंगी बोलत होते. या वेळी लक्ष्मणराव पौळ, बालाजी मुंडे, राजाभाऊ पौळ, सुर्यभान मुंडे, मनोहर केदार, बाळासाहेब किरवले, संतोष पांडे, जानीमियॉ कुरेशी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना आ. धनंजय मुंडे म्हणाले की, माझं इमान सिरसाळकरांशी आहे. येणार्या अर्थसंकल्पात सिरसाळा बसस्टँड विशेष बाब म्हणून मंजूर करणार असल्याचे सांगून आधीच्या लोकप्रतिनिधींनी काय दिले? हा प्रश्न आज सिरसाळकरांना पडला असेल. ग्रामपंचायत कोणाचीही असो विकास मात्र माझ्या हातून होणार असल्याचे सांगून सिरसाळ्यासाठी लवकरच दोन प्रकल्प आणणार असल्याचे आ. मुंडे यांनी म्हटले. परळी ते सिरसाळा सिमेंट काँक्रेट कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे सांगून परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिरसाळा येथील जागेत स्थानीकच्या व्यापार्यांसाठी 93 दुकाने काढले असल्याचे त्यांनी सांगितले. विटभट्टीचे क्लस्टर याठिकाणी उभारण्यात येणार असल्याचे सांगून नागपूर येथून गोव्याला जाणार्या शक्तीभक्तीचा मार्ग आपल्या तालुक्यातून आपण नेतोय हीच आपली ताकद आहे. सिरसाळ्यातील जनतेचे प्रत्येक स्वप्न साकार करणार आहे, सिरसाळ्यासाठी विकासाची एक-एक विट माझ्या हातून लागतेय हे माझे भाग्य असल्याचे सांगत परळी प्रमाणेच सिरसाळ्याचा विकास होईल, हा माझा शब्द असल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटले.