परळी (रिपोर्टर) जलजीवन मिशन योजनेअंतर्गत अंबाजोगाई तालुक्यातील निरपणा येथे उद्या जे भूमिपूजन होत आहे. त्या उद्घाटनाशी आपला काडीमात्र संबंध नसल्याचे सांगून निरपणा गावच्या सरपंच कालिंदाबाई रामराव जाधव यांनी जाहीरपणे 6 मार्च 2023 रोजी माजी मंत्री तथा आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते संबंधित कामाचे भूमिपूजन व कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ होणार असल्याचे सांगितले. उद्या माजी मंत्री पंकजा मुंडे या कामाचे भूमिपुजन करणार असल्याचे सांगण्यात येत होते.
याबाबत अधिक असे की, जिल्हाभरात सध्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामे चालू आहेत. अनेक ठिकाणी या कामाचे श्रेय घेण्याचे काम अनेक नेते करत आहेत. अधिवेशन असल्या कारणाने त्या त्या मतदारसंघाचे आमदार हे अधिवेशनात गुंतलेले असल्याने त्याचाच फायदा घेत पराभूत आमदार आपआपल्या मतदारसंघात उद्घाटन अथवा भूमिुपजन कार्यक्रम उरकून घेत असल्याचे दिसून येते. असाच काहीसा प्रकार परळी विधानसभा मतदारसंघातल्या अंबाजोगाई तालुक्यातील निरपणा येथे उघडकीस आला. स्थानिक सरपंचांना विश्वासात न घेता भाजपाकडून याठिकाणी सदरील नळयोजनेचे भूमिपुजन कार्यक्रम आयोजीत केला. मात्र येथील राष्ट्रवादीच्या सरपंच कालिंदाबाई रामराव जाधव यांनी जाहीरपणे या कार्यक्रमाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले. याउलट जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गावात जे काम होणार आहे त्या कामाचे भूमिपूजन माजी मंत्री तथा आ. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते 6 मार्च 2023 रोजी होणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले.