Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाराज्यात ‘अनलॉक’चे काऊंटडाऊन सुरू

राज्यात ‘अनलॉक’चे काऊंटडाऊन सुरू

मुंबई (रिपोर्टर):- करोनाच्या दुसर्‍या लाटेचा मोठा फटका बसल्याने ठाकरे सरकारकडून राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात 1 जूनपर्यंत कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान दुसरी लाट ओसरली असून रुग्णसंख्या कमी होत असल्याने ठाकरे सरकारकडून लॉकडाउन शिथील केला जाण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले आहेत. दरम्यान ठाकरे सरकार टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथील करण्याची योजना आखत असल्याचं वृत्त इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
आपण तयारीचा आढावा घेणार आहोत. जर सर्व गोष्टी सकारात्मक असतील तरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री टास्क फोर्समधील तज्ज्ञांशी चर्चा करत निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा विचार करु शकतात. निर्बंध पूर्णपणे उठवले जातील या भ्रमात राहू नका, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
   मिळालेल्या माहितीनुसार, सरकारकडून लॉकडाउन उठवण्याची तयारी सुरु झाली असून 30 जूनपर्यंत सर्व गोष्टी पार पडतील. निर्बंध शिथील करण्यास नेमकी कधीपासून सुरुवात होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तिसर्‍या लाटेची भीती असल्याने निर्बंध पूर्णपणे उठवले जाणार नाहीत, मात्र काही प्रमाणात शिथीलता दिली जाऊ शकते.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अनलॉक करण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक गोष्टींची चाचपणी केली जाणार आहे. पण जर रुग्णसंख्या वाढू लागली आणि हव्या तितक्या प्रमाणात लसीकरण झालं नसेल तर पुन्हा लॉकडाउन लागण्याची शक्यता आहे. लॉकडाउनसंबंधी निर्णय घेताना राज्य सरकारकडून तीन महत्वाच्या गोष्टींचा विचार केला जाईल. आगामी कॅबिनेट तसंच टास्क फोर्ससोबत होणार्‍या बैठकीत यावर चर्चा होईल. यानंतरच निर्णय घेतला जाईल.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात लॉकडाउनसंबंधी बोलताना लॉकडाउन उठवू शकतो, मात्र लोकांना नियमांचं पालन करावं लागेल असं सूचक विधान केलं होतं. मात्र यावेळी त्यांनी परिस्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे ठाकरे सरकार काय निर्णय घेणार हे 1 जूनपर्यंतच स्पष्ट होईल.

चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन
पहिला टप्पा – दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाईल.
दुसरा टप्पा – दैनंदिन गरजांशी संबंधित अन्य काही दुकानांना सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. पर्यायी दिवसांवर ही दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल,.
तिसरा टप्पा – हॉटेल्स, परमिट रुम, बिअर बार, दारुच्या दुकानांना निर्बंधासह सुरु ठेवण्यास परवानगी असेल. हॉटेल्सना 50 टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाईल.
चौथा टप्पा – मुंबई लोकल, धार्मिक स्थळं, जिल्हाबंदी पुढे ढकलली जाऊ शकते.

लॉकडाऊनचा निर्णय शुक्रवारी
आरोग्यमंत्र्यांची माहिती

राज्यात सुरु असलेला लॉकडाउन संपणार की आणखी वाढणार? याबाबत नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्हे आहेत. मागील काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांत लॉकडाउनसंदर्भात विविध प्रकारच्या बातम्या येत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी लॉकडाउनबाबत महत्वाचं विधान केलं आहे. लॉकडाउनचा निर्णय शुक्रवारी होणार्‍या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर घेतला जाणार आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षत्येखाली होणार्‍या बैठकीत राज्यातील लॉकडउनची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. 31 मे रोजी राज्यातील लॉकडाउन संपणार आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!