दुकानातील साहित्य जळून खाक;
दुकानदारांचे 15 लाखांपेक्षा जास्तीचे
नुकसान; बीड शहरातील घटना
बीड, (रिपोर्टर):- काल सायंकाळी बीड शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी वादळी-वार्यासह पाऊस झाला. या अवकाळी पावसाने बहुतांश ठिकाणी नुकसान झाले. वार्याने शहरातील चांदणी चौक परिसरातील विजेची तार तुटून दुकानावर पडली. यामुळे दुकानाला आग लागली. या आगीने रौद्र रूप धारण केले. आग आटोक्यात येण्याऐवजी ती वाढत गेली. 5 दुकाना आगीच्या विळख्यात सापडल्या. या आगीत पाच दुकानातील 16 लाखांपेक्षा जास्तीचे नुकसान झाले. आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती लवकर आटोक्यात आली नाही. ही घटना रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान घडली. या दुर्दैवी घटनेने पेठ बीड भागामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीड शहरामध्ये रात्री वादळी वार्यासह पाऊस झाला. वार्यामुळे अनेक ठिकाणी विजेमध्ये बिघाड झाला. काही ठिकाणी झाडे पडली. शहरातील चांदणी चौक परिसरात विजेची तार तुटून दुकानावर पडली. त्यामुळे दुकानाने पेट घेतला.त्यात अबरार अॅटोमोबाईल्स, अरफान इंटरप्रायजेस, साईनाथ ट्रान्सपोर्ट, हमी अॅटोमोबाईल्स, राशन दुकान क्रं. 12 या पाच दुकानांना आग लागली. आग आटोक्यात आली नसल्याने ती पसरत गेली. अग्निशामक दलाला लवकर आग विझवता आली नाही. या सर्व दुकानात मोठ्या प्रमाणात विविध साहित्य होते. हे साहित्य पुर्णत: जळुन खाक झाले. विशेष करून राशन दुकानात माल मोठ्या प्रमाणात भरलेला होता. हा मालही पुर्ण जळून गेला आहे. सर्व दुकानदारांचे 16 लाखांपेक्षा जास्तीचे नुकसान झाले. या घटनेने पेठ बीड भागात हळहळ व्यक्त होत आहे. सकाळी प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी आले होते. त्यांनी घटनेचा पंचनामा केला.