दिंद्रुड(रिपोर्टर): दुचाकीला पाठीमागून धडक देत झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. जवळपास एक किलोमीटर दुचाकीला जखमी तरुणासह आयशरने फरफटत नेले होते.
सविस्तर वृत्त असे की, दिंद्रुड येथील अशोक पांडुरंग ठोंबरे (वय 32 वर्ष) यांचे दिंद्रुड पासून जवळच असलेल्या बेलोरा पॉईंटजवळ इंद्रायणी ट्रेडर्स हे दुकान आहे. बुधवारी रात्री साडेदहा वाजे दरम्यान दुकान बंद करून घराकडे येत असताना बीड-परळी महामार्गावरील दिंद्रुड च्या सरस्वती नदीच्या पुलावर आयशर टेम्पो एम एच 14 के ए 9315 ने दुचाकी ला पाठीमागून धडक दिली असता अशोक पांडुरंग ठोंबरे हा तरुण जबर मार लागल्यामुळे हायवेवर पडला तर आयशरने दुचाकीसह
हमाल कांतीलाल खराडे यास जवळपास एक किलोमीटर फरफटत नेले. या अपघातात अशोक पांडुरंग ठोंबरे व हमाल कांतीलाल खिराडे (रा.खुंदरी जि बडवाणी,मध्यप्रदेश) हे दोघे गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमी अशोक ठोंबरे यास माजलगाव येथे प्रथमोपचार करून छत्रपती संभाजी नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी मयत घोषित केले. तर दुसरा गंभीर जखमी कांतीलाल खिराडे यास अंबेजोगाई येथील स्वराती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.सदरील अपघातातील आयशर व ड्रॉयव्हर दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे.