गेवराई (रिपोर्टर) बंदोबस्त आटोपून घराकडे निघालेल्या एका पोलीस कर्मचार्याला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 22 एप्रिल रोजी कोल्हेर फाटा ते गेवराईकडे जाणार्या रोडवर घडली. या प्रकरणी अज्ञात तिघा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
तलवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले नारायण श्रीकिसन काकडे हे पोलीस हवालदार 22 एप्रिल रोजी तलवाडा येथे आर्केस्ट्रा कार्यक्रमासाठी बंदोबस्ताला होते. बंदोबस्त आटोपून ते रात्री सव्वा अकराच्या दरम्यान गेवराईकडे निघाले होते. कोल्हेर रोडवर आले असता पाठीमागून अज्ञात तीन जण आले आणि ‘तुमच्या टायरची हवा कमी झाली आहे’, असे म्हणल्याने काकडे यांनी आपली दुचाकी साईडला घेतली. या वेळी तिघे स्वत:च्या दुचाकीवरून खाली उतरले आणि आर्केस्ट्राच्या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला खाली बसा का म्हणालात, पोलीस लई माजलेत, ’ असे म्हणत काकडे यांना मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला मात्र काकडे हे बाजुला सरकले मात्र या मारहाणी दरम्यान हल्लेखोरांनी काकडे यांच्या गाडीची चावी, तसेच त्यांच्या खिशातील मोबाईल बळजबरीने काढून घेत तेथून पोबारा केला. या प्रकरणी गेवराई पोलिसात कलम 392, 341, 34 भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.उप.नि. भुतेकर हे करत आहेत.