बीड (रिपोर्टर) विकासासाठी गावपुढारी अन् नागरिकांनी आपआपल्या पक्षाचे जोडे बाजूला ठेवत गावचा विकास करुन बीड तालुक्यातील कोळवाडीकरांनी शासनाचे अनेक पुरस्कार मिळविले आहेत. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धा 2018 -19 मध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये हे गाव मराठवाड्यातून प्रथम आले आज दि. 25 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयात दहा लाख रोख अन् सन्मानचिन्हाने कोळवाडी ग्रामस्थांना सन्मानित करण्यात आले.
बीड तालुक्यातील कोळवाडी ग्रामस्थांनी आपल्या एकीच्या जोरावर, गटतट बाजूला ठेऊन मागील 7 वर्षापासून गावामध्ये स्वच्छता अभियान राबऊन ग्रामपंचायत स्तरावरील विविध अभियाने, स्पर्धा या मध्ये सक्रीय सहभाग नोंदऊन तालुका, जिल्हास्तरावरील विविध पुरस्कार पटकावले आहेत. आज विभागीय आयुक्त कार्यालय छ.संभाजीनगर येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन 2018 -19 मध्ये मराठवाडा विभागीय स्तरावरचा प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत कोळवाडी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तत्कालीन ग्रामसेवक व ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ यांना अप्पर विभागीय आयुक्त यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिंन्ह व 10 लक्ष रुपये पारितोषकाचा धनादेश देऊन सन्मानीत करण्यात आले. या सोबत बीड जिल्हयातील ग्रामपंचायत आवरगांव तालुका धारूर, ग्रामपंचायत टोकवाडी ता.परळी यांचा सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ यांचा देखील सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पारितोषीकाचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामंपचायत कोळवाडी सरपंच श्रीमती दोपदी अंकुश वाघमारे, उपसरपंच तुळशिदास शिंदे (महाराज), ग्रामसेवक आनंद शिंदे, सखाराम काशिद, ग्रामपंचायत सदस्य लहु शिंदे, आकाश शिंदे, गोरख जाधव, सोमीनाथ यादव, राम शिंदे, शिवलाल शिंदे इत्यादी उपस्थित होते.