बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाने रौद्ररुप धारण केल्याने शेतकर्याचे तीन बैल, एक म्हैस आणि एका घोड्याचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून अंबाजोगाई तालुक्यातील दोन महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे तर काढणीस आलेल्या उन्हाळी बाजरी, गहू, टरबुज, खरबुजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
काल बीड जिल्ह्यात दुपारपासून वीज, वादळ, वार्यासह मोठ्या प्रमाणात तडाख्याचा पाऊस झाला.एकूण 52 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद असून अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा महसूल मंडळात 91.7 मि.मी. इतका अतिवृष्टीचा पाऊस पडला तर ममदापूर महसूल मंडळात 67.3 इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या महसूल मंडळातील गहू, उन्हाळी बाजरी, खरबुज, टरबुज या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे परत एकदा शेतकर्यांना या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. तर काही शेतकर्यांचे बैल, म्हशी या जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये परळी तालुक्यातील मांडवखेल येथील बाळू प्रभाकर ढाकणे यांचा वीज पडून बैल मृत्यू पावला आहे. दुसर्या घटनेत धारूर तालुक्यातील म्हातारगाव येथे भरत बळीराम देवकते यांचाही बैल वीज पडून मृत्यू पावला आहे. केज तालुक्यातील महालिंग शिवलिंग तगडे यांच्या गोठ्यात बांधलेल्या बैलाचा मृत्यू झालेला आहे. अंबाजोगाई येथील पट्टीवडगाव येथील राजाभाऊ तारसे यांची म्हैस वीज पडून मृत्यू पावली. पाटोदा तालुक्यातील मौजे जवळाला येथील श्रीधर बबन कोटुळे यांचा बैल वीज पडून मृत्यू पावला. परळी तालुक्यातील दौंडवाडी येथील अरुण नारायण इचके यांच्या घोड्याचा वीज पडून मृत्यू झाला. अशा प्रकारे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीच्या पिकासह जनावरांची जीवीत हानी झालेली आहे.
केळगावच्या शेतकर्याचा वीज पडून मृत्यू
केज : शेतात काम करत असलेल्या शेतकर्यावर अचानक वीज कोसळल्याने मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना केळगाव (ता. केज) येथे काही वेळापूर्वी घडली आहे. काही ठिकाणी आजही गारपीटीने झोपल्याचे वृत्त आहे.
मागील काही दिवसांपासून केज तालुक्यासह बीड जिल्ह्यावर अवकाळीचे काळेकुट्ट ढग घोंगावत आहेत. यापूर्वीही गारपीट व वीज कोसळून शेतीची आणि जीवितहानी झाली आहे. आज शुक्रवारी (दि. 28) सकाळ पासूनच केज तालुक्यातील काही भागात ढग दाटून आले. पाऊसही झाला. मस्साजोग भागात जोरदार गारपीट झाली आहे. तसेच केळगाव (ता. केज) येथे वीज कोसळल्याने शेतकरी बिभीषण आण्णासाहेब घुले या शेतकर्याचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. मागील पंधरा दिवसांपासून बीड जिल्ह्यात वीज कोसळून जीवितहानीच्या घटनेत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे.