परळी/अंबाजोगाई (रिपोर्टर) कार्यकर्ता हेच आपले सर्वस्व मानणारे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा परळीसह अंबाजोगाई बाजार समितीमध्ये विरोधकांच्या चारही मुंड्या चित्त करत आपल्या कार्यकर्त्यांना विजयाचा गुलाल लावला. अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीत धनंजय मुंडे गटाचे 15 उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाले तर पंकजा मुंडे गटाला केवळ 3 जागांवर यश मिळवता आले. इकडे परळीत मतमोजणी संथगतीने सुरू असून या ठिकाणीही 11 जागांवर धनंजय मुंडे गटाचा दणदणीत विजय झाला आहे तर उर्वरित 7 जागांवर मुंडे गट आघाडी घेऊन आहे. हा निकाल भाजपा नेत्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का मानला जात आहे.
राज्याच्या राजकारणामध्ये दबदबा निर्माण करून सोडणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे हे कुठलीही निवडणूक स्वत:ची निवडणूक असल्यासारखी लढवतात. कार्यकर्ते आपल्याला निवडूनआणण्यासाठी रात्रीचा दिवस करतात, जिवाचे रान करतात अशा वेळी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीतही आपण तेवढ्याच ताकतीने लढले पाहिजे, त्यानुसार धनंजय मुंडेंनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत लक्ष घालून जिल्ह्यातल्या बाजार समित्या आघाडीच्या ताब्यात आणण्यासाठी मोठी मेहनत घेतली तर परळी आणि अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मोठी ताकद लावली. अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये योगेश्वरी शेतकरी विकास पॅनल महाआघाडी म्हणून धनंजय मुंडे गटाचे उमेदवार रिंगणात होते तर माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या गटाने आपली ताकत लावली होती. मात्र या ठिकाणी धनंजय मुंडे वरचढ ठरले आणि पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव या ठिकाणी केला. अंबाजोगाईमध्ये 18 पैकी 15 जागांवर धनंजय मुंडे गटाला घवघवीत यश मिळालं तर पंकजा मुंडे गटाला केवळ 3 जागांवर समाधाना मानावे लागले. इकडे परळीमध्येही सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 11 जागांवर धनंजय मुंडे गटाचे उमेदवार हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले तर अन्य सात जागांवर धनंजय मुंडे यांच्या गटाचे उमेदवार आघाडीवर असून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना जबरदस्त धक्का देत धनंजय मुंडेंनी परळीवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व असल्याचे यातून दाखवून दिले आहे.