साहेब, राजीनामा परत घ्या
कार्यकर्ते, पदाधिकार्यांची मागणी; राष्ट्रवादीची बैठक सुरू, सुप्रिया सुळेंचे नाव आघाडीवर, जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा, जयंत पाटलांना थेट पवारांचा फोन
मुंबई (रिपोर्टर) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर पक्षात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा परत घ्यावा, अशी विनवणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केेंद्रामध्ये राष्ट्रवादीची महत्वपुर्ण बैठक होत असून या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित आहेत. बैठकीमध्ये शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी केली जात असल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेंचे नावही पुढे येत असल्याचे सुत्रांनी सांगणे आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बैठकीबाबत काहीच माहित नसल्याने आणि पाटील गैरहजर असल्याचे दिसून आल्याने थेट पवारांनी जयंत पाटील यांना मुंबईला बोलावून घेतल्याचे वृत्त आहे.
शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर पक्षामध्ये अनेक घडामोडी होत असून अनेक पदाधिकार्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनीही पक्षाच्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा पत्रकार परिषदेत घेऊन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात होत असून या बैठकीत शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील या वरिष्ठ नेत्यांसह अन्य नेतेही उपस्थित आहेत. शरद पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा परत घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केली जात आहे. दुपारी एक वाजता शरद पवार हे पुन्हा सभागृहात आले असून ते सर्वांशी चर्चा करत आहेत. याच दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. आव्हाडांसह ठाण्यातील अनेक पदाधिकार्यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येते तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बैठकीबाबत माहिती देण्यात आली नसल्याने ते अनुपस्थित होते. थेट शरद पवारांनी त्यांना फोन करून बैठकीला बोलवले आहे. ते संध्याकाळपर्यंत मुंबईत पोहचतील. याबाबत जयंत पाटील यांनी या बैठकीला मला बोलवण्याची गरज वाटली नसेल, सगळ्या ठिकाण आपण असावे, असा आग्रह धरू नये, अशी प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते.