ऑनलाईन रिपोर्टर-
निवडणूक आयोग, राज्यपाल ब्रह्मदेव नाही. सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाले आहे. आता नैतिकता असेल तर शिंदे-फडणवीसांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भूमिका मांडली. यावेळी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव उपस्थित होते. या दोघांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. भरत गोगावले यांची प्रतोपदी नियुक्ती बेकायदेशीर आहे. राज्यपालांच्या भूमिकेवरही ताशेरे ओढत नबाम रेबियाप्रमाणे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा विचार करता येणार नाही, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठाकडे पाठवले. या साऱ्या प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी आपले मत मांडले.
सत्तेसाठी हपापले
उद्ध ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही, याबद्दल आहे. सत्तेसाठी हापापलेल्या लोकांच्या उघड्यानागड्या राजकारणाची चिरफाड केली. राज्यपाल महोदयांची भूमिका सरळसरळ अयोग्य होती. राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
अध्यक्षांकडे विनंती करू
उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यपाल आदरयुक्त यंत्रणा होती. मात्र, तिचे धिंडवडे शासन काढते. त्यामुळे ही ठेवावी की नाही. पक्षादेश आमचाच राहील. लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विधानसभा अध्यक्षांकडे विनंती करणार. राजीनामा दिला नसतो, तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो. माझी लढाई जनतेसाठी असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
ते मंजूर नव्हते
मुख्यमंत्र्यांमध्ये थोडीही नैतिकता असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा. ज्या पक्षाने ज्यांना सगळे काही दिले. मात्र, तरी सुद्धा ते माझ्या पाठीत वार करायला निघाले. ज्यांनी विश्वासघात केला, तेच जर मला विश्वासाबद्दल विचारत असतील, तर ते अयोग्य आहे. त्यामुळे मी राजीनामा दिला. सगळे देऊनही काही हपापले लोक माझ्यावर अविश्वास दाखवणे मंजूर नव्हते. त्यामुळे मी क्षणाचाही विलंब न करता राजीनामा दिला. आता थोडी नैतिकता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांत असेल, तर त्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.
पक्षादेश माझाच
उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय निकाल देऊ शकते. मात्र, त्यांनी या संस्थेचा आदर राखण्यासाठी अधिकार अध्यक्षांकडे दिला. मात्र, पक्षादेश माझ्या शिवसेनेचाच चालणार आहे. निवडणूक आयोग, राज्यपालांवर ताशेरे ओढलेत. आता तरी त्यांनी सुधारावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. राज्यपालांचा चाकरासारखा वापर सुरू आहे. मात्र, चार स्तंभाला वाळवी लागली असेल, तर त्याची डागडुजी आता आपल्याला करावी लागेल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
बारा वाजवून जातील
राज्यपाल बारा वाजवून जातील, पण मग त्यांना सजा काय, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. प्रत्येक राज्यपाल आमच्या काळात यांचे बारा वाजवून जायचे आहे म्हणतील. निकाल येईपर्यंत ते घरी पोहचतील, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. राज्यपाल, निवडणूक आयोग म्हणजे ब्रह्मदेव नाही. पक्षाला नाव देणे हा निवडणूक आयोगाचा अधिकार नसल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.
एकत्र काम करू
नीतीश कुमार म्हणाले की, जास्तीत जास्त पक्षांनी एकत्र मिळून काम करावे, अशी अनेकांशी चर्चा झाली आहे. सर्वांची बैठक कधी होईल हे पाहू. आम्हा साऱ्यांचा विचार एकच आहे. देशाच्या हिताचे एकत्रित येऊन काम करू.