बीडकृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सरला मुळे तर उपसभापतीपदी पडुळे यांची बिनविरोध निवड
बीड (रिपोर्टर) माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या 40 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत निर्विवादीत वर्चस्व प्रस्थापीत करणारे आ. संदीप क्षीरसागर यांच्या गटाच्या सरला मुळे या सभापती म्हणून तर उपसभापती म्हणून शामराव पडुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसभापती पद हे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्याकडे गेले आहे.
याबाबत अधिक असे की, बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा चार दशकापासून दबदबा होता. गेल्या आठवड्यापूर्वी सदरच्या बाजार समितीची निवडणूक झाली. तत्पूर्वी या निवडणुकीसाठी आ. संदीप क्षीरसागर यांनी भाजपाचे राजेंद्र मस्के, ठाकरे गटाचे अनिल जगताप, शिंदे गटाचे कुंडलिक खांडे, शिवसंग्राम यासह शेतकरी संघटनेची एक मोट बांधत माजी मंत्री क्षीरसागरांविरोधात निवडणूक लढविली. या निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या आघाडीला दणदणीत विजय मिळवत 15 जागा कमावता आल्या. तर माजी मंत्री क्षीरसागर यांच्या गटाला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. आज या बाजार समितीच्या सभापती-उपसभापतीपदाची निवडणूक होती. सभापती पदासाठी सरला मुळे तर उपसभापतीपदासाठी शामराव पडुळे यांनी अर्ज दाखल केला. अन्य कोणाचाही अर्ज आला नसल्याने या दोघांची बिनविरोध म्हणून निवड करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आ. संदीप क्षीरसागर हे आता सहकार क्षेत्रात आपलं वर्चस्व निर्माण करू पाहत आहे. गजानन सहकारी साखर कारखाना चालू केल्यानंतर सहकार क्षेत्रातली दुसरी संस्था आता आपल्या हातात आ. संदीप क्षीरसागर यांनी घेतली आहे. सरला मुळे आणि पडुळे यांची निवड झाल्यानंतर आ. संदीप क्षीरसागर यांच्या गोटात जल्लोषाचे वातावरण असून निवडीनंतर फटाक्यांच्या आतिषबाजीसह गुलालाची उधळण करत समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.