मुंबई (रिपोर्टर) कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव झाल्याचं दिसून येत असून काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवल्याचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलं आहे. भाजपाच्या राज्यातील आणि केंद्रीय नेत्यांनीही हा पराभव मान्य करून विरोधी पक्षात बसण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून या निकालावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकमध्ये भाजपाच्या झालेल्या मोठ्या पराभवावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनाही शरद पवारांनी लक्ष्य केलं आहे.
अलिकडच्या काळात भाजपाकडून इतर पक्षांची सत्ता असणार्या राज्यात आमदार फोडून सत्ता घेण्याचा प्रयत्न करणं, त्यासाठी सत्तेचा वापर करणं हे सूत्र वापरलं आह. कर्नाटकातही त्यांनी हेच केलं. महाराष्ट्रात जे एकनाथ शिंदेंनी केलं, तेच तिथे झालं. तेच मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या बाबतीत केलं. गोव्यातही भाजपाचं बहुमत नसताना आमदार फोडून ते राज्य हातात घेतलं. ही एक नवीन पद्धत साधन संपत्तीचा वापर करून राबवली जात आहे. पण त्याची दुसरी बाजू म्हणजे फोडाफोडी, खोक्यांचं राजकारण लोकांना पसंत नाही. याचं उत्तम उदाहरण कर्नाटकमध्ये दिसलं आहे, असं शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.