जिल्ह्यातील तलावात 25 टक्केच पाण्याचा साठा
बीड (रिपोर्टर) गेल्या आठ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होऊ लागले. जिल्ह्यातील तलावात 25 टक्केच पाण्याचा साठा शिल्लक राहिला. काही तलावात तर 15 टक्केच पाण्याचा साठा उपलब्ध आहे. यावर्षी तलाव पुर्णपणे भरले होते. उन्हाळी पिकांना शेतकर्यांनी पाणी देण्यास सुरु केले आहे. त्यातच सुर्य आग ओकत असल्याने पाणी कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात चांगला पाऊस पडत आहे. या पावसाने जिल्हाभरातील 99 टक्के तलाव भरले होते. यावर्षी आणि गेल्या वर्षी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. इतर पिकेही शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात घेतली आहे. उन्हाळी पिकांमुळे तलावातील पाण्याचा साठा बराच कमी झाला. त्यातच उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होऊ लागले आहे. आगामी काळात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन दक्षता घेत असल्याचे दिसून येत आहे.