रेणापूर-उदगीर मार्गावर रात्री 10 वाजेची घटना
लातूर/रेणापूर (रिपोर्टर): भरधाव ट्रकने ओमनीला दिलेल्या धडकेत बीड येथील न्यायाधीश आणि त्यांचा चालक जागीच ठार झाल्याची घटना रेणापूर- उदगीर मार्गावरील सेवादासनगर तांडा येथे घडली. हाअपघातशुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडला. तो एवढा भीषण होता की, यात ओमनी कारचा पार चेंदामेंदा झाला.
पोलिसांनी सांगितले, उद्धव वसंत पाटील (रा. अजनसोंडा खु., ता. चाकूर) हे सध्याला बीड येथे दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी ते चालक बळी नंदकुमार टमके (रा. अजनसोंडा खु., ता. चाकूर) यांच्यासोबत ओमनीने (एमएच 17 बीव्ही 1257) गावाकडे निघाले होते. दरम्यान, रेणापूर- उदगीर मार्गावरील आष्टामोडकडे जाताना सेवादासनगर तांडा येथे शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने (एमएच 24 एबी 8401) त्यांच्या वाहनाला जोराची धडक दिली. यामध्ये न्यायाधीश पाटील आणि चालक टमके हे जागीच ठार झाले. हाअपघातएवढा भीषण होता की, ट्रक शंभर फुटावरून चुकीच्या दिशेने येत न्यायाधीशांच्या वाहनावर धडकला. घटनास्थळावरून ट्रकचालक पसार झाला.घटनास्थळी तांड्यावरील युवक, नागरिकांनी धाव घेतली. ओमनी वाहनाचा पार चेंदामेंदा झाल्याने त्या दोघांनाही बाहेर काढण्यासाठी दीड तासाचा अवधी लागला. रेणापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.
वर्षभरापूर्वीच झाली होती निवड
न्यायाधीश उद्धव पाटील हे गत अनेक वर्षांपासून लातूर येथे वकिली करत होते. दरम्यान, त्यांची एक वर्षापूर्वीच न्यायाधीश म्हणून निवड झाली होती. सध्या बीड जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. शनिवार- रविवार सुटी असल्याने ते गावाकडे रेणापूर- उदगीर मार्गावरून शुक्रवारी निघाले होते. मात्र, त्यांच्यावर काळाने घाला घातला. यातच ते आणि चालक जागीच ठार झाले.