वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; उद्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार
बीड (रिपोर्टर)- माजी केंद्रिय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे नववे खासदार बबनराव ढाकणे यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. निमोनिया झाल्याने गेल्या काही दिवसांपासून बबनराव ढाकणे यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रुणालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरु असताना रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा प्रतापराव ढाकणे सुन, नातवंडे असा परिवार आहे. एक संघर्षशील नेता म्हणून उभा महाराष्ट्र त्यांच्याकडे पहात आला आहे. त्यांच्या पार्थीवदेहावर शनिवार उद्या दुपारी एक वाजता पागोरी पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातील अकोल्यात जन्मलेले बबनराव ढाकणे हे विद्यार्थी दशेपासून समाजकारणामध्ये सक्रिय असायचे. गोवा मुक्ती सत्याग्रहात त्यांनी प्रामुख्याने सहभाग नोंदवलेला आहे. समाजकारण करण्याबरोबर ते राजकारणात आले. स्थानीक स्वराज्य संस्थांवर दबदबा निर्माण केल्यानंतर बीडच्या बहुचर्चित माजी खासदार केशरकाकु क्षीरसागर यांच्या विरोधात लोकसभा लढवण्यासाठी त्यांनी बीड मतदारसंघ निवडला. तीन दशकांपूर्वी केशरकाकुंना मोठया मताधिक्याने बबनराव ढाकणे यांनी पराभूत केले. विशेष म्हणजे जनता दलमार्फत निवडणूक लढवणारे आणि जिल्हाबाहेरून बीड जिल्ह्याच्या जनतेचा विश्वास कमावणारे बबनराव जिल्ह्यात कायम चर्चेत राहिले. नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. तेथून या रेल्वे मार्गाच्या कामाला काहीशी गती मिळाली. बबनराव ढाकणे यांनी बाजार समितीच्या माध्यमातून सुरुवातीच्या कालखंडात आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला होता. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, अशा एक-एक पायर्या ते चढत गेले. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये त्यांनी ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम केलेे. तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री, ग्रामविकास राज्यमंत्री हे खाते सांभाळले. संघर्षशील आणि आक्रमक नेता म्हणून बबनरावांची राज्यभर ओळख होती. आपल्या कार्यकाळात पाथर्क्ष तालुक्यातील विकासाच्या मुद्यावरून विधानसभेत त्यांनी पत्रके भिरकावली होती. ऊसतोड कामगारांचे नेते म्हणून ते सुपरिचीत होते. तीन वेळा विधानसभा, एक वेळा विधान परिषद, एक वेळ खासदार म्हणून त्यांनी काम केले. पाथर्डी तालुक्यातील अकोले सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदापासून थेट केंद्रिय मंत्री पदापर्यंत त्यांनी झेप घेतली. संघर्षशील योद्धा म्हणून ते ओळखले जात होते.
मार्गदर्शक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले -धनंजय मुंडे
बबनराव ढाकणे यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात व्हावा
बीड जिल्ह्याचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून त्यांच्या रूपाने एक मार्गदर्शक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले अशा शब्दात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
कै. बबनराव ढाकणे यांनी बीड जिल्ह्याचे खासदार म्हणून नेतृत्व केले होते, त्याचबरोबर केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. राज्यात सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास या खात्यांचे मंत्री म्हणून, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते व उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम केले. ऊसतोड कामगार, शेतकरी-कष्टकर्यांचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. गोवा मुक्तीच्या चळवळीतही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले होते. उद्या दि. 28 रोजी ढाकणे यांचे मुळगाव पागोरी पिंपळगाव ता.पाथर्डी जि. अहनदनगर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. राज्याच्या व देशाच्या प्रति त्यांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून उद्या दि. 28 रोजी त्यांचा होणारा अंत्यविधी शासकीय इतमामात व्हावा, अशी विनंती (पान 7 वर)
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका पत्राद्वारे केली आहे. ढाकणे व मुंडे कुटुंबाचे अनेक वर्षांपासून स्नेहबंध होते. धनंजय मुंडे यांना कै. बबनराव ढाकणे यांचा सहवास व मार्गदर्शन अनेकदा लाभलेले आहे. काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्त पाथर्डी येथे बबनराव ढाकणे यांच्या सह धनंजय मुंडे हेदेखील उपस्थित होते. कै. बबनराव ढाकणे यांनी विद्यार्थी चळवळीपासून आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. विधानसभेत पेक्षक गॅलरी मध्ये बसून आमदारांवर पत्रके भिरकावून घोषणा देत बाहेर पडलेले बबनराव ढाकणे यांचा राजकीय आलेख कायम चढता राहिला होता.
ऊसतोड कामगार, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांच्या प्रश्नांवर ते कायम आग्रही असायचे. त्यांच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली असून, आपण एक मार्गदर्शक नेतृत्व गमावले आहे. आपण ढाकणे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.