बीड (रिपोर्टर)- काल रात्री बीड-संभाजीनगर महामार्गावर पाडळसिंगीपासून ते रांजणी, हिरापूर या ठिकाणी तीन ते चार वेळा आंदोलने झाली. रस्त्यावर टायर जाळण्यात आले. एका बसलाही आग लावण्यात आली. त्यापाठोपाठ आज सकाळी अकरा वाजता पुन्हा एकदा बीड शहरानजीक असलेल्या बायपासवरील महालक्ष्मी चौकात हजारोंच्या संख्येने मराठा तरुण महामार्ग रस्त्यावर उतरले. ‘एक मराठा लाख मराठा’ ची घोषणा करत रास्ता रोको आंदोलन सुरू केला. एक ते दीड तासाच्या रास्ता रोकोमुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजुने शेकडोवर वाहने थांबल्यामुळे वाहतूक कोंडी पहावयास मिळाली. संतप्त आंदोलकांनी मराठा समाजाला आरक्षण तात्काळ देण्याची मागणी करत मराठा आरक्षणासाठी सराटे अंतरवलीत आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांच्या जिवाचे बरे-वाईट झाले तर महाराष्ट्रात आगडोंब उसळेल, त्याची पुर्ण जबाबदारी ही सरकारची असेल, असा इशारा दिला. इकडे बीडपासून काही अंतरावर असलेल्या नगर रोडवरील चर्हाटा फाट्यावर सकाळी दहा ते अकरा वाजता अहमदपूर-संभाजीनगर (क्र. एम.एच. 13 सी.यू. 7987) या बसवर अंधाधूंद दगडफेक करण्यात आली. बसच्या पुर्ण काचा फोडण्यात आल्या, त्यानंतर आंदोलक तेथून पसार झाले. या आंदोलनाने पुन्हा एकदा हिंसक वळण येत असल्याचे चित्र समोर येत आहे.
बीडची बससेवा शंभर टक्के बंद
रात्रीपासून मराठा समाजाचे आंदोलन हिंसक होत असल्याने आणि रात्री एक बस जाळण्यात
आल्याने आज सकाळपासून बीड बसस्थानकासह जिल्ह्यातल्या बहुतांशी बसस्थानकातून
एकही बस सोडण्यात आली नाही. काल गेलेल्या बसेस आज अद्याप पावेत परत
आल्या नसल्याचे सांगण्यात येते. चर्हाटा फाट्यानजीक आज पुन्हा
बसवर दगडफेकीची घटना घडल्याने बससेवा पुर्णत:
बंद करण्यात आली आहे.