आष्टीत मराठा समाज आक्रमक
तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयाला
कुलूप ठोकले कर्मचारी अधिकारी डांबून ठेवले
आष्टी (रिपोर्टर):- मराठा समाज आरक्षण प्रकरणी आष्टी तालुक्यात चांगलेच वातावरण तापले आहे.बहुतांश गावात राजकीय पुढार्यांना बंदी केली आहे.आज सकाळी च तहसिलदार यांची गाडी आगीत भस्मसात झाली आहे.आग लावली का लागली अद्याप स्पष्ट झाले नाही अशातच सकल मराठा समाजाच्या वतीने आष्टी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले असून काही कर्मचारी अधिकारी कार्यालयातच अडकले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांना सरकारने दिलेली मुदत संपल्यानंतर पुन्हा जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले असून आज 6 वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत आहे.त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आष्टी तालुक्यातील मराठा समाज एकवटला आहे.गावागावात साखळी उपोषण,कॅन्डल मार्च निघत आहेत.आज दि.30 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12 वाजता आष्टी तहसिल कार्यालय, पंचायत समिती, रजिस्टर ऑफिस,इरिगेशन, बांधकाम विभाग,पोस्ट ऑफिस,वनविभाग आदीसह शासकीय कार्यालयांना मराठा समाज आंदोलकांनी कुलुप ठोकले असून अधिकारी कर्मचारी कार्यालयातच डांबून ठेवण्यात आले.मराठा समाज आंदोलकांचा तीव्र रोष दिसून आला आहे.