बीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यातील मांडवा येते एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देण्यात आला आहे. सदरील हा प्रकार मुलीच्या पित्याला समजल्यानंतर त्याने याबाबत आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीसह मुलगा देखील अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
मांडवा येथील एका दहा वर्षीय मुलीचा तेरा वर्षीय अल्पवयीन मुलासोबत मुलीच्या आईने विवाह लावून दिला होता. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी ही बाब पोलीस अधिक्षक बीड आणि आष्टी येथील पोलीस ठाणे येथे तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून तपासाची चक्रे फिरवण्यात आली. त्यानुसार आष्टी पोलीस ठाण्यामध्ये चार व्यक्तिंविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अन्वये कलम 9, 10 आणि 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये सुशिला एकनाथ पवार, गौतम रघुनाथ काळे, माया गौतम काळे, राधा गौतम काळे यांचा समावेश आहे. पोलिसांनी ही बाब बीड येथील महिला बालहक्क समितीला कळविल्यानंतर समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे आणि चाईल्ड लाईनचे तत्वशील कांबळे यांनी या विवाहातील अल्पवयीन मुलीला बालसुधारगृह बीड येथे दाखल करून घेतलेले आहे.