बीड (रिपोर्टर): 30 ऑक्टोबर रोजी बीड शहरात दगडफेक आणि जाळपोळीसारख्या गंभीर घटना घडल्या. या घटनांचे राज्यभरात पडसाद उमटले. जाळपोळ करणारे हे आंदोलकांच्या आडून घटनांना अंजाम देत असल्याचा सूर सातत्याने उमटत गेला. पुर्ण प्लॅनिंगने जाळपोळीच्या घटना घडवण्यात आल्या, असेही स्पष्ट होत आले आहे. अशा स्थितीत आज राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे बीडमध्ये डेरेदाखल होत ज्या ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ झाली त्या ठिकाणी ते भेट देत आहेत. सर्वप्रथम त्यांनी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सचीन मुळुक यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीची पाहणी केली, नंतर ते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाची पाहणी करत होते. या वेळी उपस्थित पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांना दोन दिवसात यातील आरोपींना अटक करा, अशा सूचना मुंडेंनी दिल्या. दुपारनंतर ते क्षीरसागरांच्या बंगल्यासह राऊत यांच्या हॉटेलची आणि पंडित यांच्या शिवछत्राची पाहणी करणार आहेत.
30 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणासाठी उभा राहिलेल्या आंदोलनाच्या आडून काह असामाजिक तत्वाच्या लोकांनी बीडमध्ये क्षीरसागरांच्या बंगल्याला आग लावली. खांडे, मुळुक यांच्या कार्यालयाची तोडफोड करत जाळपोळ केली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या कार्यालयालाही आग लावली. बीआरएसचे दिलीप गोरे यांचे कार्यालयही तोडले. धैर्यशील सोळंके यांच्या घराला आग लावली.
समता परिषदेचे सुभाष राऊत यांची हॉटेल जाळली. माजी आ. अमरसिंह पंडित यांच्या शिवछत्रावर दगडफेक केली. यासह शहरातील अन्य काही भागांमध्ये दगडफेक आणि जाळपोळीसारख्या घटनांना अंजाम दिले. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. घटनेचे गांभीर्य पाहून जाळपोळ, हिंसाचार करणार्यांविरोधात 307 सारखे गुन्हे दाखल करत त्यांचे अटकसत्र सुरू केले. आतापर्यंत 140 च्या आसपास आरोपी अटकेत आहेत. मात्र यातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत. आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ेय डेरेदाखल होत सर्वच घटनांस्थळावर जात पाहणी सुरू केली. सर्वप्रथम त्यांनी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सचीन मुळुक यांच्या कार्यालयाची पाहणी केली. पुढे ते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाची पाहणी करत होते. नंतर त्यांनी योगेश क्षीरसागर यांची भेट घेऊन घटनाक्रमाची माहिती घेतली. या वेळी उपस्थित एसपींना धनंजय मुंडे यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या. आयजींना बोलवा, पथके तयार करा, परंतु या घटनाक्रमातले आरोपी तात्काळ अटक करा, असे त्यांनी म्हटले. मुंडे हे पाहणी करत असून अन्य सोळंके, राऊत, पंडित यांच्यासह काही ठिकाणी धनंजय मुुंडे हे पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.