जिल्ह्यातील ग्रा.पं.साठी दुपारपर्यंत 40 टक्के मतदान
नेकनूरमध्ये तिरंगी लढत, बाचाबाची, पोलिसांचा सौम्य लाठीमार
बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून): गावपातळीवर महत्वाच्या असलेल्या बीड जिल्ह्यातील 158 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी बारा वाजेपर्यंत 40 टक्के मतदान झाले होते. बीड तालुक्यातील नेकनूर ग्रामपंचायत सर्वाधिक मोठी असून या ठिकाणी तीन पॅनल निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. नेकनूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदानावरून शाब्दीक बाचाबाची झाल्याने पोलिसांना दोन ते तीन वेळेस सौम्य लाठीमार करावा लागला. या ठिकाणी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमावत तळ ठोकून होते.
बीड जिल्ह्यातील दुसर्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. आठ ते दहा दिवस प्रचार झाल्यानंतर आज मतदान होत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अटीतटीच्या लढती पहावयास मिळाल्या. काही ग्रामपंचायती मोठ्या असल्यामुळे त्या ग्रामपंचायतींकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे लक्ष लागून राहिलेले आहे. दुपारपर्यंत 158 ग्रामपंचायतींसाठी 40 टक्के मतदान झाले होते. मतदाना दरम्यान कुठलाही
अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलीस बळ तैनात करण्यात आलेला आहे. नेकनूर ग्रामपंचायत निवडणूक अटितटीची होत आहे. या ठिकाणी तीन पॅनल पडले आहेत, एक कृषीमंत्री धनंजय मुंडे गट, दुसरा पॅनल शिवसंग्रामचा तर तिसरा पॅनल भाजपाचा आहे. भाजपाला मात्र उमेदवार शोधशोधता नाकीनऊ आले होते. मतदानाच्या दरम्यान नेकनूर येथे बाचाबाची झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. चाळीस पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले. 17 जागेसाठी मतदान होत असून 6 वार्ड आहेत. मतदानस्थळी सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत तळ ठोकून होते. नेकनूरसह इतर ग्रामपंचायतींमध्ये दुपारपर्यंत अगदी शांततेत मतदान सुरू होते. दरम्यान शिरूर तालुक्यात 15 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असून दुपारपर्यंत तालुक्यात 50 टक्के मतदान झाले होते.
वरिष्ठ अधिकार्यांसह पोलिसांचा तगडा बंदोबस्त
जिल्ह्यात होत असलेल्या 158 ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह 1326 पोलीस कर्मचार्यांचा बंदोबस्त आहे. त्यामध्ये 2 अप्पर पोलीस अधिक्षक, 5 डिवायएसपी, 68 अधिकार्यांसह एकूण 1326 पोलीस कर्मचारी आहेत. त्यामध्ये 726 पोलीस कर्मचारी, 600 होमगार्ड तसेच एसआरपीएफच्या दोन कंपन्या, 5 आरसीपी प्लाटून, 2 क्युआरटीच्या तुकड्या असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आठ ग्रामपंचायतींसाठी
दुपारपर्यंत 40% मतदान
वडवणी वडवणी तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत असुन सकाळपासुनच शांततेत मतदान होत आहे.दुपारी एक वाजेपर्यंत 40% मतदान झाले आहे. तर दुपार नंतर मतदानाचा टक्का वाढणार आहे.
खापरवाडी सरपंच पदासाठी 4 तर सदस्य पदासाठी 19, परडी माटेगांव सरपंच 2 सदस्यसाठी 18, चिंचोटी सरपंच 3 सदास्य पदासाठी 27, कान्हापुर सरपंच 3 सदस्यासाठी 18, मोरवड सरपंच 2 सदस्यासाठी 18, हरिश्चंद्र पिंप्री सरपंच 3 सदस्यासाठी 20, खडकी सरपंच 4 तर सदस्यासाठी 30, कवडगांव सरपंच 2 तर सदस्यासाठी 22 असे एकुण आठ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 23 तर एकुण 74 सदस्याच्या जागेसाठी तब्बल 172 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात लोकशाही उत्साहात सहभागी झाले आहेत. तर आज सकाळी 7.30 वाजल्यापासून शांततेत मतदान प्रक्रिया होत आहे. दुपारी एक वाजेपर्यत जवळपास 40% मतदान झाले आहे.तर दुपार नंतर मतदानाचा टक्का वाढणार असल्याचे दिसून येत आहे. वडवणी तालुक्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसाचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.तर निवडणुक विभाग देखील प्रत्येक गांवानिहाय बुथ केंद्रावर करडी नजर ठेवून आहे.
आष्टीत दोन ग्रामपंचायत बिनविरोध
आष्टी तालक्यात एकूण 4 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी कोयाळ आणि धिर्डी या दोन ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्या असल्याने केवळ दोनच ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. त्यातील रुईनालकोल ग्रामपंचायत 9 सदस्यांची असून त्यातील दोन सदस्य बिनविरोध निवडून आले आहे तर सांगळी आष्टी ही सात सदस्यीय ग्रा.पं. आहे. येथे दुपारी साडेअकरापर्यंत 36 टक्के मतदान झाले आहे. मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे.
धारूरमध्ये शांततेत मतदान सुरू
धारूर तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. यातील दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात 18 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे. यामध्ये भोगलवाडी, पहाडी पारगाव आणि गोपालपूर या मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत 48 टक्के मतदान शांततेत पार पडले. भोगलवाडी, पहाडीपारगाव आणि गोपालपूर या मोठ्या ग्रामपंचायती असल्यामुळे तेथे बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे.
उमापूरमध्ये चौरंगी लढत
दुपारपर्यत 40 टकके मतदान
गेवराई तालुकयातील 17 सदसय असलेली उमापूर ग्रामपंचायतसाठी आज मतदान होत आहे. येथे चौरंगी लढत होत असून सरपंचपदासाठी पाच जण रिंणात आहेत तर राष्ष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात सरळ लढत असून एकजण सरपंचपदासाठी अपक्ष म्हणून उभा आहे. दुपारपर्यंत 40 टक्के मतदान झाले होते. तर गेवराई तालुक्यात 32 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून दुपारी 1 वाजेपर्यंत 35 टक्के मतदान झाले.
तालखेडमध्ये दुरंगी लढत,
50 टक्के मतदान
माजलगाव तालुक्यातील तालखेड ही ग्रामपंचायत 13 सदस्यांची असून दुपारी एक वाजेपर्यंत 5 बुथवर 50 टक्के मतदान झाले होते. तालखेड, धर्मेवाडी, जामगा तांडासह आठ तांडे एकत्रित असल्याने ही ग्रुप ग्रामपंायत असून याकडे माजलगावसह गेवराई मतदारसंघाचे लक्ष लागून आहे. हे गाव माजलगाव तालुक्यात असून गेवराई मतदारसंघात येते.येथे मोहन जाधव यांचे ताडेश्वर ग्रामविकास परिवर्तन पॅनल आणि ताडेश्वर ग्रामविकास आघाडी यांच्यामध्ये सरळ सरळ लढत होत आहे.