Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडमाजलगावमुख्याध्यापकाच्या वादात शिक्षिकेने घेतले शाळेत विष, राजेवाडीच्या जि.प.शाळेत आज सकाळी घडली घटना

मुख्याध्यापकाच्या वादात शिक्षिकेने घेतले शाळेत विष, राजेवाडीच्या जि.प.शाळेत आज सकाळी घडली घटना


शिक्षिका माजलगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल
प्रकृती गंभीर, वादामुळे शाळा सुरू झाल्यानंतरही गावकर्‍यांनी ठेवली होती बंद
माजलगाव (रिपोर्टर) शाळा सुरू होऊनही केवळ मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या वादामुळे आज पावेत गावकर्‍यांनी शाळा बंद ठेवली होती. आज पुन्हा शिक्षीका आणि मुख्याध्यापकात वाद झाला. सदरचा वाद टोकाला गेल्यानंतर शिक्षीकेने ‘मी शाळेतच आत्महत्या करते,’ म्हणत शाळेत विष प्राशन केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील राजेवाडी येथे आज सकाळी अकरा वाजता घडली. शिक्षीकेने विष प्राशन केल्याबरोबर उपस्थित काही गावकर्‍यांनी सदरच्या शिक्षीकेला माजलगावच्या योगीराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. सदरील शिक्षीकेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. तिच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत.


माजलगाव शहरापासून 30 कि.मी. अंतरावर राजेवाडी हे गाव आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा असून या शाळेवर सात शिक्षक कार्यरत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी मुख्याध्यापक जिंकलवाड आणि शिक्षिका संगीता राठोड यांच्यात वाद चालू आहे. हे वाद पराकोटीचे असल्यामुळे एक तारखेपासून शाळा सुरु होऊनही गावकर्‍यांनी जोपर्यंत तुमचे वाद मिटत नाहीत, तोपर्यंत शाळा सुरू करू नका, म्हणत शाळा बंद ठेवली होती. तसे निवेदनही गटशिक्षणाधिकार्‍यांना देण्यात आले होते. मात्र गेल्या पाच दिवसांच्या कालखंडात वरिष्ठ अधिकार्‍यांनी या गंभीर प्रकरणाकडे लक्ष दिले नाही. आज सकाळी शिक्षक शाळेत आले, मुख्याध्यापक जिंकलवाड आणि शिक्षिका संगीता राठोड यांच्यात शाब्दीक वाद सुरू झाले. मोठमोठ्याने एकमेकांवर बोलणे सुरू झाल्यानंतर काही गावकरी त्या ठिकाणी पोहचले मात्र या वेळी शिक्षिका संगीता राठोड यांनी टोकाचं पाऊल उचललं. ‘मी आता शाळेतच आत्महत्या करते,’ म्हणत सदरील शिक्षिकेने विषारी औषध प्राशन केले. या वेळी उपस्तित गावकर्‍यांनी शिक्षिकेला माजलगाव शहरातील योगीराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. सध्या शिक्षिकेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून आयसीयुमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदरचे प्रकरण शिक्षण विभागाने गांभीर्याने घेऊन यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!