व्यापार्याचे घर पेट्रोल टाकून जाळले
एक गंभीर जखमी; केज तालुक्यातील प्रकार
केज (रिपोर्टर): शेतकर्यांकडून ठोकमध्ये भाजीपाला खरेदी करून त्याचा व्यापार करणार्या एका सर्वसामान्य व्यावसायिकाच्या घरावर अज्ञात आरोपींनी पेट्रोल टाकत पेटवून दिल्याने या घटनेत एकजण गंभीररित्या भाजला गेला. तर घरातील लहान मुलांसह अन्य व्यक्तींना बाहेर काढण्यात उपस्थित शेजार्यांना यश आले. सदरची घटना ही केज तालुक्यातील ढाकेफळ येथे मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सदरची घटना कोणी आणि का घडवून आणली हे अद्याप समजू शकले नाही तरी या घटनेने केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गोविंद दिलीप थोरात हे केज तालुक्यातील ढाकेफळ येथे राहतात. ते येथी शेतकर्याचा भाजीपाला ठोकमध्ये घेऊन बाहेर विकतात. रात्री अज्ञात लोकांनी त्यांच्या घरावर पेट्रोल टाकून घर जाळून देण्याचा प्रयत्न केला. आग लागली असताना गोविंद थोरात यांचे संपुर्ण कुटुंब घरात होते. त्यावेळी शेजारी राहणारे वैजिनाथ व्यंकटी थोरात यांनी पत्र्याचे शेड उचकटून आतमध्ये झोपलेले गोविंद थोरात यांची पत्नी आणि मुलांना कसेबसे बाहेर काढले. यामध्ये वैजिनाथ थोरात हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास ठाणेप्रमुख योगेश उबाळे हे करत आहेत.