मजीद शेख । बीड
बीड- मराठवाड्यातील दुष्काळी कालचक्र संपता, संपत नाही. दोन,चार वर्षाला दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ मराठवाड्यातील जनतेवर येते. दुष्काळामुळे शेतकर्यांचं मोठं नुकसान होतं. पाणी नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परंपारीक पिकातून म्हणावा तसा आर्थिक फायदा होत नसल्याने अनेक शेतकर्यांनी फळबागांची लागवड करण्यास सुरुवात केली. फळबागा जोपासणं ही तारेवरची कसरत असते. गेली तीन वर्ष चांगला पाऊस पडल्याने बीड जिल्हयातील बहुतांश शेतकर्यांनी फळबागांची लागवड केली. आज स्थितीत जिल्हयात 14594.48 हेक्टमध्ये विविध फळबागाची लागवड आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार असून आताच विहीर, बोअर आणि तलावांनी तळ गाठल्याने फळबागा जोपासायच्या कशा असा प्रश्न फळबाग उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे.

पारंपारीक आणि जुन्या पध्दतीच्या पिक लागवडीतून फायदा होत नाही. त्यासाठी शेतकर्यांनी शेती करतांना आधुनिकतेची कास धरली पाहिजे, असं नेहमीच सांगितले जाते, पण शेतकर्यांना नेहमीच कोणत्या, ना कोणत्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ येत असते. कधी अतिरिक्त पाऊस, कधी दुष्काळ पडतो, त्यामुळे शेतकर्यांचं गणीत बिघडत. मराठवाडा दुष्काळी भाग म्हणुन ओळखला जातो. या भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असते. 80 टक्के शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गेली तीन वर्ष चांगला पाऊस पडला. सर्व तलावे पुर्णंता भरल्यामुळे पाण्याची पातळी वाढली होती. शेतकर्यांनी उन्हाळी पिकांसह फळबागांची लागवड गेली. फळबागा जोपासणं हे तसं मेहनतीचं काम आहे. फळबागातून आर्थिक फायदा होतो, म्हणुन शेतकर्यांनी मोसंबी, अंबा,चिकू यासह इतर फळपिकांची लागवड केली. तीन वर्षात फळबागांचं क्षेत्र वाढलं. आज स्थितीत बीड जिल्हयात 14594.48 हेक्टरमध्ये फळबागा आहेत. यंदा पाऊस कमी पडला. पावसाने सरासरी पुर्ण केली नाही. जिल्हयात आज तलावात फक्त 20 टक्के पाण्याचा साठा आहे. आताच तलाव, विहीर, बोअरने तळ गाठलेला आहे. त्यामुळे पुर्ण उन्हाळ्यात बागा जोपासाच्या कशा असा प्रश्न फळबाग शेतकर्यांना पडला आहे.
—
शेतकरी टँकरने पाणी आणुन टाकू लागले
फळबागातून तीन किंवा चार वर्षानंतर उत्पन्नाला सुरुवात होत असते. चार वर्ष फळबागासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. त्याला खर्च ही करावा लागतो. ज्यांनी तीन वर्षापुर्वी फळबागा लावल्या. त्यांच्या बागातून अजुन उत्पन्न सुरु झाले नाही तोच यंदा दुष्काळाने गाठले आहे. बागा जोपासण्यासाठी शेतकरी टँकरने पाणी आणुन टाकू लागले.
—-
गेवराईत सर्वाधिक मोसंबीचं क्षेत्र
मोसंबीच्या बागा पुर्वी इतर ठिकाणी दिसायच्या, मात्र मोसंबीची लागवड बीड जिल्हयात वाढली. गोदावरी पट्ट्यात पाण्याची सुविधा असल्याने गेवराई तालुक्यातील शेतकर्यांनी तीन वर्षात मोसंबीची लागवड मोठया प्रमाणात केली. एकटया गेवराई तालुक्यात 2046.81 हेक्टरमध्ये मोसंबीची लावगड झालेली आहे. गोदावरीला पाणी असतं. त्यातच तालुक्यात काही ठिकाणी बंधारे बांधण्यात आल्याने शेतकर्यांनी मोसंबी लावली. यंदा मोसंबीच्या बागा जगवणं अवघड झालं आहे.
—–
शासनाने बागा जगवण्यासाठी मदत करावी
यंदा मराठवाडा दुष्काळात होरपाळून निघणार आहे. मराठवाड्यातील फळबाग उत्पादक शेतकर्यांचा राज्य सरकारने विचार करुन फळबागा जगवण्यासाठी शेतकर्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. कृषी मंत्री बीड जिल्हयातील आहेत. शेतकर्यांच्या हितासाठी त्यांनी आता पर्यंत अनेक चांगले निर्णय घेतले. ना. धनंजय मुंडे हे फळबाग उत्पादक शेतकर्यांच्या मदतीला नक्कीच धावून येतील अशी अपेक्षा केली जात आहे.









