मंबर्ई (रिपोर्टर) गेली अडीच वर्षे शिवसेना पक्षप्रमुखांसह आमदारांवर जहरी टीका करणार्या भाजपाला अखेर शिवसेनेचेच आमदार गोड वाटू लागले अन् शिवसेनेशी बंडखोरी करून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेंसह सोबतीच्या आमदारांना सोबत घेऊन भाजपा महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली करत असून शिंदे गटाला आठ कॅबिनेट तर पाच राज्यमंत्रिपद देत एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद देऊन देवेंद्र फडणवीस स्वत: राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविण्याच्या तयारीत असून त्यासाठी ते दिल्लीला रवाना झाले आहेत.
विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटाने भाजपासोबत सरकार स्थापन करण्यासंदर्भात मंथन करून अखेर सत्ता स्थापनेवर एकमत झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षावरून भाजप-शिंदे गट एकत्रित येण्याचा जाहीर निर्णय घेत आहेत. गेल्या पाच दिवसात भाजपाच्या नेत्यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिल्या नाहीत मात्र कालपासून भाजपाचे नेते समोर येऊन सावध प्रतिक्रिया देत सत्ता स्थापनेचे संकेत देत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटाला आठ कॅबिनेट, पाच राज्यमंत्रिपद देण्यात येणार असून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदावर भाजप विराजमान करणार आहे. यासर्व वाटाघाटी चर्चेतून निश्चित झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला रवाना झाले आहेत. अमित शहा यांच्या सोबत याबाबत महत्वपुर्ण चर्चा करून ते बहुमतात सरकार स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रात परतणार असल्याचे सांगण्यात येते.
राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक; शिंदे गटाची सत्तास्थापनेची खलबतं
आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात येणार आहे. दुपारी अडीच वाजता बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. तर दुसर्या बाजूला शिंदे गटाचीही दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. उद्या एकनाथ शिंदे मुंबईला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर एकनाथ शिंदे मुंबईला राज्यपालांकडे जाणार आहेत आणि सरकारचा पाठिंबा काढण्याचं पत्र देणार असल्याची माहितीही हाती येत आहे. या बैठकीत सत्तास्थापनेतबाबत चर्चा होणार आहे.
बंडखोर मंत्र्यांविरोधात असीम सरोदेंची कोर्टात धाव
बंड केलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील मंत्री असलेल्या आमदारांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आठ दिवसांपासून राज्यातील आठ मंत्री असलेले आणि आमदार यांनी बंडखोरी करुन स्वतःच्या स्वार्थासाठी राज्याबाहेर गेले आहेत याच विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक उपद्रव पसरवल्या प्रकरणी आणि सामान्य नागरिकाचे प्रश्न विसरल्याने कारवाई व्हावी यासाठी ही जनहित याचिका असीम सरोदे यांच्या मार्फत दाखल करण्यात आली आहे.