संभाजीनगर, जालन्यात ट्रॅक्टर मालकांना नोटीसा
बीडमध्ये पोलीस महानिरीक्षकांची सकाळपासून बैठक सुरू
बीड/संभाजीनगर (रिपोर्टर): 23 डिसेंबर रोजी बीड येथे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांची जाहीर इशारा सभा होत आहे. त्या सभेच्या अनुषंगाने पोलीस हरकतमध्ये आल्याचे दिसून येत असून त्यांनी गेल्या 24 तासात बीडसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातल्या मराठा कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या नोटीसा बजावल्या आहेत. दुसरीकडे जालना आणि संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टर मालकांनाही नोटीसा दिल्याचे समजते. तर इकडे बीडमध्ये आज सकाळी 11 वाजल्यापासून संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण हे अधिकारी, कर्मचार्यांची महत्वपुर्ण बैठक घेत आहेत. या बैठकीनंतर ते सभास्थळाची पाहणी करणार आहेत.
मराठा आरक्षणाचा मुदा ऐरणीवर असून राज्य सरकार त्यावर अद्याप तोडगा काढण्यात सपशेल अपयशी ठरलं आहे. 24 डिसेंबर हे आंदोलकांनी सरकारसाठी अल्टिमेट दिलेले आहे. तर 23 डिसेंबर रोजी बीडमध्ये पुढील आंदोलनाची रणनीती ठरविण्या हेतू आणि राज्य सरकारला इशारा देण्यासाठी इशारा सभा आयोजीत केली आहे. या सभेसाठी लाखो मराठ्यांची उपस्थिती असणार असून त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. मात्र बीड, जालना, संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशीव, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात रमाठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. त्याचबरोबर कघाही ठिकाणी ट्रॅक्टर मालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर बीडमध्ये पोलीस महानिरीक्षक चव्हाण हे सकाळपासून पोलीस अधिकार्यांच्या बैठका घेत आहेत. बैठकीनंतर चव्हाण सभास्थळाची पाहणी करणार आहेत.
मराठ्यांना चेतवू नका -जरांगे
नोटीसा पाठवून मराठ्यांना चितवू नका, असे म्हणत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पोलिसांच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाजातील कार्यकर्त्यांना कशाच्या आधारावर नोटीसा दिल्या? असा सवाल करत फक्त ट्रॅक्टर वापरला म्हणून नोटीसा देणार का? असा प्रश्न करत याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं, असंही त्यांनी म्हटलं आहे. असा तो कोण अधिकारी आहे जो मराठ्यांमध्ये आणि सरकारमध्ये जाणीवपूर्वक वितुष्ट निर्माण करतो, अशा अधिकार्यांना निलंबीत करा, असेही जरांगेंनी म्हटले.











