पांढर्याच्यावाडीतील घटना ; दोन्ही महिलांना अटक
गेवराई, (रिपोर्टर)ः-मुलीचे नांदणे मोडले, हा राग मनात धरून आणि 4 लाख रूपयाचे आमिष दाखवत तालुक्यातील गेवराई येथे पांढर्याची वाडी येथे दोन लहान मुलांना उंदीर मारण्याचे औषध खायला घालून जिवे मारल्याची घटना गेल्या 20 दिवसापुर्वी घडली. याबाबत तलवाडा पोलिस ठाण्यामध्ये आकस्मात मृत्युचा गुन्हा अज्ञात लोकांवर अदखल पात्र झाला होता. मात्र गेल्या दोन दिवसापुर्वी घरातील भावकीत चर्चा झाल्याने उंदीर मारण्याच्या औषध खावू घातल्यानेच या मुलांचा मृत्यु झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याअनुषंगाने तलवाडा पोलिस ठाण्यामध्ये या दोन महिलांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
गेवराई तालुक्यातील पांढर्याचीवाडी या ठिकाणी सखुबाई ज्योतीराम भावले, स्वाती उमाजी भावले या दोघी शेजारी-शेजारी राहतात. दरम्यान सखुबाई ज्योतीराम भावले या महिलेच्या मुलीचा विवाह दोन वर्षापुर्वी अमोल सुखदेव भावले यांच्या सासर्याकडील नातेवाईकासोबत झाला होता. मात्र सखुबाईच्या मुलीचे नांदणे मोडण्यास अमोल हाच कारणीभुत आहे असा राग अनेक दिवसांपासुन सखुबाईच्या डोक्यात घर करून बसला होता. याचा बदला कोणत्याही परिस्थितीमध्ये घ्यायचा अशी खुन गाठ सखुबाईने मनाशी बांधून स्वाती उमाजी भावले हिला आपल्या गटात सहभागी करून घेतले. त्यासाठी स्वातीला 4 लाख रूपये देण्याचे आमिष ही दाखवले होते. त्यातुनच सखुबाई ज्योतीराम भावले आणि स्वाती उमाजी भावले जे की मयत मुलाची चुलती असुन फिर्यादीची भावजई आहे. या दोघीनी मिळून दोन वर्षे वयाचा तनुजा अमोल भावले या दोन वर्षीय वयाच्या मुलीस आणि किशोर अमोल भावले या 13 वर्षीय मुलास उंदीर मारण्याचे औषध हातावर देवून ते चाटायला लावले. ही घटना 20 दिवसापुर्वी घडली. त्यातुन या दोन्ही मुलांना मोठ्या प्रमाणात विष बाधा झाली. त्यात मुलगी तनुजा हिचा मुत्यू बीड येथील एका खाजगी दवाखान्यात झाला तर मुलगा किशोर भावले याचा मृत्यु संभाजीनगर या ठिकाणी उपचार घेत असतांना झाला. यामध्ये मयत मुलाचे पिता अमोल सुखदेव भावले यांच्या फिर्यादीवरून या दोन महिलांविरूध्द तलवाडा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असुन या दोघींनाही पोलिसांनी अटक केली आहे.











