संत वामनभाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त गडावर भक्तांची मांदियाळी
पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते पहाटे महापुजा
25 कोटींच्या कामाचे भूमिपूजन तर आणखी 25 कोटींच्या निधीची फडणविसांकडून घोषणा

गहिनीनाथ गड (रिपोर्टर): ‘मी इथे उपमुख्यमंत्री म्हणून आलो नाही तर गडाचा सेवेकरी म्हणून आलो’, असल्याचे सांगत या गडाने आमचे नेते गोपीनाथराव मुंडे यांना सातत्याने आशिर्वाद दिले आहेत, त्यामुळे वामनभाऊंसह इथे स्व. मुंडे यांचेही आशिर्वाद मिळतात, असे सांगत मी दिलेला पंचेवीस कोटींचा शब्द आज पुर्ण करत आहे. पुढच्या नवीन बजेटमध्ये या गडासाठी आणखी 25 कोटी रुपये विकास कामासाठी देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी केली. तर माझ्या संघर्षाच्या काळात गहिनीनाथ गड माझ्या पाठिशी खंबीरपणे उभा होता आणि आहे. या गडामुळेच आपण अपघातातून बचावल्याचे राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगून या गडाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले. तर वंचीत बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी समता-बंधुत्वाचा संदेश या गडाने आजपर्यंत दिला आहे. त्याप्रमाणेच यापुढे आपण सर्वजण राहू, असे म्हटले. आज पहाटे राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते महापुजा झाली.

श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर श्री संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होेते. या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर, गडाचे मठाधिपती ह.भ.प. विठ्ठल महाराज, उत्तम स्वामी, प्रितमताई मुंडे, बाळासाहेब आजबे, जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस, मोनका राजळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रत्येक वर्षी धनंजय मुंडे यांच्या हस्ते पहाटेच्या दरम्यान महापुजा होते. गेल्या 20 वर्षांपासून धनंजय मुंडे हे याठिकाणी महापुजा करत असून आज पहाटेही मुंडेंच्या हस्ते विधीवत महापुजा करण्यात आली. संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजीत विकास कामांच्या भूमीपुजन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, माझ्यासाठी आजचा दिवस सुवर्णक्षराने लिहिला जाईल, असा आहे. गेल्या वीस वर्षांच्या कालखंडात केवळ गेल्यावर्षीच मी या ठिकाणी येऊ शकलो नाही. मात्र यावर्षी आलो ते मंत्री पदासह आणि आमच्या बहिणीसह. गेल्या वर्षी जो अपघात झाला त्या अपघातात मी वाचलो, ती वामनभाऊंची कृपा होती. माझ्या जीवनात अनेक आगळेवेगळे अनुभव आहेत, चढउतार आहेत, माझ्या संघर्षाच्या काळामध्ये जेव्हा माझ्या आयुष्यात सापसिडीचा खेळ चालू होता त्यावेळी माझ्या पाठिमागे गहिनीनाथगड उभा होता. तुमची सेवा घडो यासाठीच वामनभाऊंनी मला पुन्हा इथं आणलं. आज 25 कोटींच्या विकास कामांचे भूमीपुजन झाले आहे. याठिकाणी असेच अभुतपूर्व कामे होत राहतील.

आज जेवढे उन्हात बसले आहेत तेवढे पुढच्या वर्षी सावलीत असतील. खर्या अर्थाने वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदायाची सुरुवात याच गडावरून झाल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले तर वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी जाती-प्रथा संपुष्टात याव्यात यासाठी त्याकाळी याच संतांनी प्रयत्न केला. त्यामुळेच या राज्यात विाजी महाराजांच्या मावळ्यांचा राज्य आलं. जाती-जातीमधलं अंतर कमी झाला पाहिजे, माणसाने माणूस म्हणून जगलं पाहिजे, त्याच संत परंपरेला गड आजही पुढे नेत असल्याचे सांगून आपण सर्वांनी आता एकता-समता आणि बंधुतेने राहिले पाहिजे, असे आंबेडकर यांनी म्हटले तर देवेंद्र फडणवीस यांनी गहिनीनाथ गड व संत वामनभाऊंच्या चरणी नतमस्तक होत मागील वर्षी मी या ठिकाणी आलो होतो, तेव्हा विठ्ंठल महाराजांनी माझ्या हाती भगवा ध्वज देऊन गडाच्या सेवेकरीचा मान दिचला होता. मी आज उपमुख्यमंत्री म्हणून आलो नाही तर गडाचा सेवेकरी म्हणून आलो आहे. इथेच मला वामनभाऊंसह गोपीनाथरावांचे आशिर्वाद मिळतात. आज पंचेवीस कोटींच्या कामाचे भूमिपूजन झाले असले तरी गडासाठी नवीन बजेटमध्ये आणखी 25 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी या वेळी केली. त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये या गडाचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व कटिब्ध असून वारकरी संप्रदायाची सुरुवात या गडाने केली. त्या गडाचा दिंडीमार्ग पुर्ण करण्यासाठी आराखडा तयार झाल्याचे सांगून पुढच्या वेळेस श्रीक्षेत्र पंढरपूर येथे गहिनीनाथ गडाची पालखी त्यांच्या स्वत:च्या जागेत असेल असेही फडणवीसांनी या वेळी म्हटले.












