निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
बीड ( रिपोर्टर) – बीडच्या जिल्हा रुग्णालयातील माता व बाल रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या 200 खाटांची इमारत 9 महिन्यापासून धूळखात पडून आहे.उभारण्यात आलेल्या इमारतीला निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे.
बीड जिल्हा रुग्णालयातील महिला व बाल रुग्णांसाठीची राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत 21 कोटी रूपये खर्चून बांधण्यात आलेली 200 खाटांच्या 5 मजली ईमारतचे बांधकाम पूर्ण झाले असून लिफ्ट,आक्सिजन पाइपलाइन, फर्निचर आदि उर्वरित कामांसाठी 7 कोटी 45 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असून शासनाच्या उदासीनतेमुळे निधी अभावी 9 महिन्यांपासून बांधकाम पुर्ण झालेली इमारत धुळखात पडुन असुन अपु-या जागेमुळे गर्भवतींची महिलांची हेळसांड होत असुन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी व जिल्हा प्रशासनाच्या उदासिनतेच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.5 सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी धरणे आंदोलन करण्यात आले .यावेळी आंदोलनात शेख युनुस,सुदाम तांदळे, शेख मुबीन,शिवशर्मा शेलार, मुस्ताक शेख,अरूण खेमाडे, प्रदीप औसरमल, रेहमान सय्यद, बाळासाहेब शिंदे आदि.सहभागी होते.
अपुर्या जागेअभावी गर्भवती महिलांची हेळसांड
बीड जिल्हा रूग्णालयाची इमारत जुनी आणि अपुरी आहे.याच ईमारतीत सोनोग्राफी केंद्र आणि एक्स रे मशिन तपासणी विभाग आहे.सोनोग्राफीसह एक्स रे करण्यासाठी येणार्या रूग्णांची नियमित संख्या 400 च्या घरात आहे.यापैकी गर्भवती महिलांची संख्या 200 च्या आसपास आहे.व्हरांड्यामध्ये बसण्याची व्यवस्था केवळ 15-20 रूग्णांपुरतीच आहे.त्यामुळे गर्भवती रूग्णांना ताटकळत उभे रहावे लागते.अपुरी जागा व अपुरे खाट यामुळे गर्भवती महिलांची हेळसांड होत आहे.ओपीडी, सोनोग्राफी तसेच आयपीडी मध्ये रूग्णांची संख्या अधिक व उपलब्ध साधन सामग्रीची क्षमता कमी असल्याने माता व बाल रूग्णालयाची स्वतंत्र इमारत बांधकामाची सुरूवात 4 वर्षांपूर्वी झाली होती.ती पुर्ण होऊन 9 महिने झाले मात्र लिफ्ट आक्सिजन पाइपलाइन, फर्निचर आदि उर्वरित कामामुळे वापरात येत नसुन धुळखात पडुन आहे.त्यामुळे गर्भवती महिलांची हेळसांड थांबवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.












