परळी वैजनाथ, (रिपोर्टर)ः- तालुक्यातील जिरेवाडी बायपास रस्त्यावर एका नाला बांधकाम ठिकाणी पुलाच्या पाईपला कार धडकून कार खड्ड्यात कोसळल्याची घटना रविवारी मध्यरात्री साडेअकरा वाजता घडली.
या अपघातात कारमधील वानटाकळी येथील रहिवाशी असलेले परळी येथे रुग्णसेवा करणारे डॉ. वाल्मीक मुंडे हे जागीच ठार झाले. तर डॉ. प्रवीण खाडे हे जखमी झाले आहेत. जखमी डॉ. खाडे यांना उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलविले आहे. जिरेवाडी बायपास रोडवर गावा लगत एका ठिकाणी नाला पुलाचे काम चालू असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दिशादर्शक बोर्ड लावलेला नाही. नाला काम अर्धवट असल्याने रस्त्यात पाईप पडलेले आहेत. यामुळे वाहन चालविताना अनेक अडचणी येत आहेत. या रस्त्यावरून डॉ प्रवीण खाडे व डॉ. वाल्मीक मुंडे हे दोघेजण कारने जिरेवाडी रविवारी रात्री अकराच्या सुमारास येत होते. नादुरुस्त रस्त्याच्या अंदाज न आल्याने कार रस्त्यावरील पाईपला धडकुन खाली खड्ड्यात कोसळली. त्यात डॉ. वाल्मीक मुंडे यांचा मृत्यू झाला. तर डॉ खाडे हे जखमी झाले आहेत. या कामाचा गुतेदाराचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी अपेक्षा मयताच्या नातेवाईक, नागरीक करत आहेत.












