सात आरोपी जेरबंद, आरोपींकडून एक पिस्टल, पाच जीवंत काडतुसांसह, आठ मोबाईल, लोखंडी रॉड जप्त
केज (सय्यद माजेद) अंबाजोगाईहून बीडकडे एका गाडीत अट्टल गुन्हेगार जात असल्याची गुप्त माहिती केज-अंबाजोगाईच्या पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी केज बसस्थानक परिसरामध्ये सापळा लावून अगदी फिल्मीस्टाईल पद्धतीने या गुन्हेगारांना पकडले. सदरील हे गुन्हेगार सात जण असून यातील तिघे जण अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. या टोळीकडून एक पिस्टल, पाच जीवंत काडतुस, लोखंडी रॉड, दांडे, आठ मोबाईल असा 9 लाख 76 हजाराचा माल जप्त करून त्यांच्याविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हे गुन्हेगार बीड जिल्ह्यामध्ये कशासाठी आले होते याची चौकशी सुरू आहे.

अशी झाली कारवाई
अंबाजोगाईकडून बीडकडे गुन्हेगारांची गाडी येत असल्याची माहिती केज-अंबाजोगाई पोलिसांना होती. त्यानुसार त्यांनी केज बसस्तानक परिसरामध्ये सशस्त्र सापळा रचला होता. चातकाप्रमाणे पोलीस आपल्या सावजाची वाट पहात होती, तेवढ्यात ईर्टिका गाडी आली, तसे पोलीस सतर्क झाले. काही हरकतमध्ये आले, जशीच गाडी बसस्थानक परिसरात येते त्याचक्षणी सापळा रचून बसलेले पोलीस फिल्मीस्टाईल बाहेर आले आणि गुन्हेगारांच्या गाडीवर बंदुका रोखून धरल्या. गुन्हेगारांकडे घातक शस्त्र असतील, असा अंदाज बांधून काही पोलिसांनी तात्काळ गाडीवर झडप घातली आणि गुन्हेगारांच्या मुसक्या बांधल्या.

अंबाजोगाईहून बीडकडे इर्टिका क्र. एम.एच. 46 सी.एम. 1934 या गाडीत अट्टल गुन्हेगार जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान केज बसस्थानकामध्ये सापळा लावला. हे गुन्हेगार अंबाजोगाईहून बसस्थानकाकडे येत असताना त्यांना पोलिसांनी पकडले. यामध्ये गणेश पांडुरंग भोसले (वय 48 रा. अंबाजोगाई), हरीश तोमर देवदिग्गा (वय 39, रा. बाजली कर्नाटक राज्य ह.मु. मुंबई), नारायण मंगळाकरण (वय 48, राज्य उडीसा ह.मु.मुंबई), श्रीवास आशाअली बारगम (वय 42, रा. मुंबई), सावंत शिवाजी गायकवाड (वय 40, रा. मुंबई), दीपक दशरथ चाटे (वय 38, रा. मुंबई) , नामदेव परशु पवार (वय 35, रा. मुंबई) या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गणेश, हरीश आणि नारायण हे तिघे जण अट्टल गुन्हेगार असल्याचे सांगण्यात येते. या गुन्हेगारांकडून एक पिस्टल, पाच जीवंत काडतुस, लोखंडी रॉड, दांडे, आठ मोबाईल असा 9 लाख 76 हजाराचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक कमलेश मीणा, अति. पो.अधिक्षक चेतना तिडके, पीआय महाजन, आनंद शिंदे, कादरी, विलास चोपणे, गीते, अनिल मंदे, महादेव बहीरवा, यादव, संतोष गिते, अशफाक इनामदार, प्रकाश मुंडे, मेहेत्रे, माने, हुंबे यांनी केली. सदरील या गुन्हेगारांची सखोल चौकशी सुरू असून हे गुन्हेगार बीड जिल्ह्यामध्ये कशासाठी आले होते याची चाकैशी सुरू आहे.












