परळी (रिपोर्टर): परळी येथील आयोजीत ब्राह्मण ऐक्य परिषद ही एकट्या बाजीराव धर्माधिकारी यांनी बोलवली नव्हती तर आम्ही सर्व सकल ब्राह्मणांनी ती बोलवली होती. त्यामुळे एकतर त्यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्या, नसता आमच्या सर्वांवर गुन्हे दाखल करा, असे म्हणत शेकडो समाज बांधव पोलीस ठाण्यावर जावून धडकले. या वेळी महिलांची संख्या लक्षणीय होती. त्याठिकाणी उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देत धर्माधिकारी यांच्यावर दाखल केलेला गुन्हा तात्काळ मागे घ्या, अशा आशयाचे निवेदन दिले. सदरचे निवेदन हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, पालकमंत्री जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनाही पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येते.
गेल्या आठवडाभरात परळी येथे ब्राह्मण ऐक्य परिषद भरवण्यात आली होती. सदरची परिषद ही धर्माधिकारी यांनी आयोजीत केली होती. या परिषदेच्या व्यासपीठावरून केतकी चितळे हिने दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर चितळे आणि धर्माधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत होती. अखेर काल केतकी चितळे आणि बाजीराव धर्माधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर आज परळी शहरातील ब्राह्मण समाजाने संतप्त होत धर्माधिकारी यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा राजकीय दबावापोटी दाखल केलेला असून तो खोटा आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे तर या आयोजनात आम्हीही सहभागी होतोत, आमच्यावरही गुन्हा दाखल करा, असे म्हणत समाज बांधवांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आणि धर्माधिकारी यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली.












