परळी (रिपोर्टर): विश्वरत्न, भारतरत्न महामानव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील इंदूमिल येथे जगातील सर्वात मोठे स्मारक महायुती सरकारच्या माध्यमातून उभारले जात आहे. विशेष म्हणजे अजितदादा पवार व धनंजय मुंडे यांच्या निर्णयामुळे या स्मारकाची उंची आणखी 100 फुटाने वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला. या स्मारकाच्या माध्यमातून बाबासाहेबांची प्रतिमा वर्षानुवर्षे जगभरात उजळत राहील, हे स्मारक गतीने पूर्ण करणार्या महायुतीच्या पाठीशी आपण मताधिक्य उभे करावे, असे आवाहन परळी वैद्यनाथ येथे बोलताना क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.

परळी शहरातील प्रबुद्ध नगर, जगतकर गल्ली, भीमनगर, ताटे गल्ली आदी भागात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबतीने नागरिकांशी संवाद साधला, त्यावेळी श्री बनसोडे बोलत होते. विरोधकांनाही आता देशात तिसर्यांदा मोदींचेच सरकार येणार, याची खात्री पटली आहे. त्यामुळे संविधान बदलण्यासारख्या अफवा पेरून बुद्धिभेद करायचा प्रयत्न सुरू असून, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान चंद्र-सूर्य असेपर्यंत अबाधित राहील, ते कुणीही बदलू शकत नाही, किंवा तसा कुणाचा प्रयत्नही नाही. त्यामुळे अशा अफवांना सुज्ञ नागरिकांनी बळी पडू नये व आपले मत वाया घालवू नये, असे आवाहन यावेळी धनंजय मुंडे यांनी केले. ना.संजय बनसोडे, ना.धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांनी यावेळी तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून या बैठकांची सुरुवात झाली. यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे, सुदर्शन मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, डॉ.विनोद जगतकर, के डी उपाडे, अनंत इंगळे, अमर रोडे, रवी मुळे यांसह आदी उपस्थित होते.










