बीड (रिपोर्टर): जिल्हा रुग्णालयामध्ये अंतर आणि बाह्य रुग्ण विभागात केस पेपर काढला जात होता. आता मात्र यात बदल करून बारकोडचा उपयोग करून केसपेपर काढला जाऊ लागला. बाह्यरुग्ण विभागात दररोज अनेक रुग्ण येत असतात, त्यात ग्रामीण भागातील रुग्णांचा जास्त प्रमाण असतो. अज्ञानी व ग्रामीण भागातील रुग्णांना बारकोड मार्फत केसपेपर कसा काढता येणार? असा प्रश्न उपस्थित होतो. ज्यांना बारकोड मार्फत केस पेपर काढता येत नाही त्यांना तरी पूर्वीप्रमाणे केसपेपर देण्याची सुविधा कायम ठेवली पाहिजे.
जिल्हा रुग्णालयामध्ये दिवसेंदिवस अनेक बदल होत आहेत, हे बदल योग्य असले तरी कधी कधी ग्रामीण भागातील लोकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रुग्णालयात दाखवण्यासाठी आधी केसपेपर घ्यावा लागतो. केसपेपर देण्यासाठी दोन-तीन कर्मचार्याचीं नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता केसपेपर बारकोडमार्फत काढण्यात येत आहे. ज्यांच्याकडे स्मार्ट मोबाईल आहे, ज्यांना याची माहिती आहे असे रुग्ण व त्यांचे नातेवाईक बारकोड मार्फत केसपेपर काढू शकतात मात्र ज्यांना मोबाईलची काही माहिती नाही, ज्यांच्याकडे मोबाईल नाही अशांनी कुठून केसपेपर काढावा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या नवीन प्रणालीमुळे ग्रामीण भागातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक गोंधळून जाऊ लागले आहे. ज्यांना बारकोड मार्फत केसपेपर काढता येत नाही त्यांच्यासाठी पूर्वीची केसपेपर देण्याची सुविधा कायम ठेवायला हवी.
रुग्णालय परिसरातील पुरुषांचे शौचालय बंद
जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये महिला आणि पुरुषांसाठी मुतारी आणि शौचालय बांधण्यात आले, जेणेकरून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना त्याठिकाणी जाता येते, मात्र गेल्या काही दिवसांपासून पुरुषांसाठ असलेले शौचालय आणि मुतारी बंद असल्याने नागरिकांची मोठी अडचण होऊ लागली आहे. काही नागरीक महिला शौचालय गृहातच जात असल्याचे दिसून येत आहे.









