शेतकर्यांची लूट थांबविण्यास कृषी विभागाला अपयश
बीड, (रिपोर्टर)ः- गेल्या दोन दिवसापासुन बीड जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडलेला आहे. पाऊस पडताच शेतकरी बि बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी कृषी दुकानदाराकडे गर्दी करत आहेत. काही कृषी दुकानदार नामांकित कंपनीच्या बियाणाचा तुटवडा दाखवून ते बियाणे जास्त दराने विक्री करू लागले. कबड्डी, रॅम्बो, पंगा यासह इतर काही बियाणांची सख्या जास्त मागणी असल्याने ही बियाणे 1200 ते 1500 रूपयांनी विक्री केले जावू लागले.कृषी दुकानदारांकडुन शेतकर्यांची लुट होत असतांनाही कृषी विभाग मात्र कुठलीही कारवाई करत नसल्याचे दिसुन येत आहे. कृषी विभागाला कारवाई करण्याबाबत अपयश येत आहे.
बीड जिल्ह्यामध्ये दरवर्षी कापुस व सोयाबीनची सर्वाधिक लागवड होते. जिल्ह्यात खरीपाचे 8 लाख हेक्टर क्षेत्र आहे. यात 3.50 लाख हेक्टरमध्ये कापसाची तर 2.50 लाख हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड होते.इतर क्षेत्रात तुर,मुग, बाजरीची लागवड होत आहे. पाऊस पडताच शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी दुकानदारांकडे गर्दी करत आहे. गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. कापसाचे बियाणे विविध कंपन्याने निर्माण केलेले आहेत. दरवर्षी वेगवेगळ्या व्हरायट्या बाजारात येतात. चांगल्या व्हरायट्या खरेदी करण्याकडे शेतकर्यांचा कल असतो. काही नामांकित बियाणांची बाजारात चलती सुरू आहे. एकच बियाणांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्याने दुकानदार त्या बियाणांचा तुटवडा दाखवून शेतकर्यांची लुट करू लागले. त्यासाठी शेतकर्यांनी एकाच बियाणांची मागणीही करू नये. सध्या कबड्डी, पंगा, रॅम्बो यासह इतर बियाणांची मागणी वाढलेली आहे. हे बियाणे प्रतिबॅग 1200 ते 1500 रूपयांपर्यंत विक्री केले जावू लागले. शेतकर्यांची कृषी दुकानदाराकडून लुट होवू नये यासाठी कृषी विभागाचे लक्ष असायला हवे. मात्र कृषी विभागाने अद्याप कोणतीच भुमिका घेतली नसल्याचे दिसुन येत आहे. सर्रासपणे कापसाच्या बियाणांची विक्री सुरू आहे.










