आम्ही संविधान वाचवणार, संसदेबाहेर ‘इंडिया’ची घोषणाबाजी
दिल्ली (वृत्तसेवा): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॅट्रीक मारत तिसर्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे देशात सरकार स्थापन केले. अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू असून त्याअनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी,राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराज चव्हाण, मनोहर खट्टर, पियूष गोयल यांच्यासह आदींनी संसदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. तर दुसरीकडे आम्ही संविधानाचं रक्षण करणार, अशा घोषणा काँग्रेसच्या खासदारांसह इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेबाहेर दिल्या. चालू अधिवेशन हे हंगामी लोकसभा अध्यक्ष भर्तृहरी महताब यांच्या उपस्थितीत होत आहे. सध्या निवडून आलेल्या खासदारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली जात आहे.
अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. तत्पूर्वी लोकसभेचे अध्यक्षपद कोणाकडे असणार? याकडे सर्वांचे लक्ष असतानाच भाजपाचे ओडीसातील खासदार भर्तृहरी महताब यांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 95 (1) अन्वये लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. त्यानंतर अध्यक्षांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकगरी, शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, एच.डी.कुमारस्वामी, पियुष गोयल, जितनराम मांझी, धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. अन्य खासदारांचा शपथविधी सुरू असून तत्पुर्वी आम्ही संविधानाचं रक्षण करणार, अशा घोषणा संसदेच्या बाहेर इंडिया अघाडीच्या वतीने देण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तास्थापनेची हॅट्रीक केली. आज दिवसभर शपथविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर प्रामुख्याने अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे कामकाज सुरू होईल.