मुंबई (रिपोर्टर): विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणार्या काँग्रेसच्या आमदारांचा अखेर पत्ता कट करण्यात आला आहे. क्रॉस वोटिंग करणार्या आमदारांना विधानसभेला तिकीट देऊ नका, असे आदेश काँग्रेस हायकमांडने दिले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात होती. अखेर त्या आमदारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानपरिषदेत निवडणुकीत ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक देखील झाली. या मागणीनंतर फुटीर आमदारांचा थेट पत्ताच कट केला आहे. काँग्रेस पक्षाकडून 5 आमदाराला विधानसभा निवडणुकीत पक्षाच तिकीट देऊ नका, असे काँग्रेस हायकमांडने नाना पटोले यांना आदेश दिले आहेत. ज्या आमदारांचा पत्ता कट केला जाणार आहे त्या आमदारांच्या पाच मतदार संघात नवीन चेहर्यांना संधी देण्यात यावी, असे देखील आदेश दिले आहेत.
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 ते 8 मतं फुटल्याचे म्हटले जात आहे. ही काँग्रेसची मतं अजित पवार यांच्या उमेदवाराला मिळाल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसने उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची 28 मते दिली होती. या 28 पैकी 3 आमदारांनी सातव यांना मतदान न करता महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसने मिलिंद नार्वेकर यांना सहा मते दिली होती. यातील एक मत फुटल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. अशोक चव्हाण यांच्याबरोबर असलेले काही आमदार तसेच अन्य काही आमदारांची मतं फुटल्याचे म्हटले जात आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी मत फुटलेल्या संशयितांवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतचा हायकमांडकडे अहवाल सादर देखील करण्यात आला. त्यानंतर हायकमांडने हा निर्णय घेतला आहे.