बीड (रिपोर्टर): बीड, गेवराई, माजलगाव, केज तालुक्यातील काही गावांमध्ये रात्री मोठया प्रमाणावर ड्रोन घिरट्या घालत असल्याने गावकर्यात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या महिनाभरापासून विविध गावांमध्ये ड्रोन घिरट्या घालत आहे. याबाबत सातत्याने पोलिसांना विचारल्यानंतरही त्यांच्याकहून कुठली अधिकृत माहिती मिळून आलेली नाही. गेल्या महिनाभरापासून दहशतीखाली असलेल्या सर्वसामान्यांना घिरट्या घालणार्या ड्रोनबाबत प्रशासनाकडून कुठलेही उत्तर मिळत नसल्याने जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षित भूमिकेबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या एक ते दीड महिन्यापासून बीड, गेवराई, माजलगाव तालुक्यामध्ये ड्रोन घिरट्या घालताना दिसून येतात. दीड महिना उलटल्यानंतरही प्रशासनाकडून अथवा पोलीस खात्याकडून ते ड्रोन नेमके कशाचे? कोण ड्रोन उडवतो याचा तपास अथवा याची अधिकृत माहिती मिळून येत नाही. गेल्या पंधरवाड्यात एखाद दुसर्या गावामध्ये ड्रोन घिरट्या घालताना दिसून येत होते. रात्री मात्र बीड, गेवराई, माजलगाव आणि केज तालुक्यातील काही गावांमध्ये ड्रोन घिरट्या घालताना दिसून आले. माजलगाव तालुक्यातल्या इरला गावापासून अन्य पाच ते सहा गावांमध्ये त्याचबरोबर इकडे करचुंडी, मोची पिंपळगाव, वायभटवाडी, घोडका राजुरी, नारायणगड परिसर, पिंपळनेर, नाथापूर, सांडरवणसह परिसरातील अन्य गावात ड्रोन घिरट्या घालताना दिूसन आलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ड्रोनबाबत जिल्हा प्रशासनाने अथवा पोलीस प्रशासनाने अधिकृत खुलासा करण्याची मागणी सर्वसामान्यातून होत आहे.
उडणार्या ड्रोनचा तपास का नाही?
ड्रोन उडवण्यासाठी जर परवाना लागत असेल तर मग गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून विविध गावांमध्ये रात्री-मध्यरात्री ड्रोन घिरट्या घालताना दिसून येतात. भयभीत झालेले नागरीक याबाबत पोलिसांनाही माहिती देतात मात्र पोलीस अथवा जिल्हा प्रशासनाकडून याचा कुठलाही तपास होत नाही किंवा सर्वसामान्य जनतेला त्याबाबत कुठलीही माहिती दिली जात नाही. आजमितीला गावागावात ड्रोन घिरट्या घालत असल्याने लोक रात्र जागून काढत आहेत.
एसपींना आजचे आज खुलासा करण्याच्या जिल्हाधिकार्यांच्या सूचना
गेल्या कित्येक दिवसांपासून वेगवेगळ्या गावांमध्ये घिरट्या घालणार्या ड्रोनबाबत आम्ही थेट जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला त्यावेली ते म्हणाले की, याबाबतच्या तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत, मी एसपींना आजचे आज घिरट्या घालणार्या ड्रोनबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी म्हटले आहे.
संशयातून सोनगाव-रुईच्या दोघांना मारहाण
रात्री ड्रोन उडत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती तसेच वेगवेगळ्या अफवा सुद्धा पसरत होत्या. ड्रोनने रेकी करून चोर्या करणार असल्याच्या अफवाही काहींनी पसरविल्या. येणार्या-जाणार्या नागरिकांवरही संशय घेतला जाऊ लागला. बीड तालुक्यातील सोनगाव येथील अनिकेत लक्ष्मण गायकवाड व रुई येथील अन्य एकजण असे दोघे जांभहून आपल्या गावाकडे मोटारसायकलवर येत होते. जांभच्या नागरिकांनी त्यांना ड्रोन उडवणार्याचा संशय घेत पकडून बेदम मारहाण केली. त्यांनी आपली ओळख सांगितल्यानंतर काही तासांनी त्यांची सुटका करण्यात आली. संशयातून अशा पद्धतीने मारहाण करणे योग्य नाही, अनेक गावांमध्ये काही लोक आपल्या नातेवाईकांकडे ये-जा करत असतात, त्यांच्याबाबतही गावकरी संशय व्यक्त करत आहेत.