बीड (रिपोर्टर): महाराष्ट्राचा धर्म कोणता? या प्रश्नाचं उत्तर स्वत:च्या धर्माच्या स्वाभीमान बाळगण्याबरोबर अन्य धर्माचा आदर करणे असे येते. हे साधू-संत-सुफींसह समाज सुधारकांनी आम्हाला सांगितले. परंतु गेल्या काही वर्षात महाराष्ट्र धर्मच बाटवण्याचं काम काही राजकीय वाचाळविरांकडून केला जात आहे. प्रामुख्याने भाजपा आ. नितेश राणे हे जाणीवपुर्वक दोन जातींमध्ये आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, असे वक्तव्ये करत आले आहेत. राणेंच्या वाच्चाळ बडबडीला ब्रेक लावण्याचे काम भाजपाने करावे अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धार्मिक तेढ निर्माण करू पाहणार्या लोकप्रतिनिधीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेख तय्यब यांनी केली आहे.
महाराष्ट्र हा साधू-संत-सुफींसह समाज सुधारकांची भूमी आहे. याच महाराष्ट्राने अठरापगड जातींना आणि धर्मांना एका माळेत गुंफण्याचे काम केले आहे. ती माळ म्हणजे या महाराष्ट्राचं स्वराज्य होतं. त्याच महाराष्ट्रात आता जात-पात-धर्म-पंथांवर भाष्य करून तेढ निर्माण केली जात आहे. स्वत:च्या धर्माचा गर्व बाळगत काही बोलघेवडे दुसर्याच्या धर्माचा अनादर करत आहेत. स्वत:च्या धार्मिक स्थळांबाबत बडेजावपणा करत अन्य धर्माच्या धार्मिक स्थळांचा अनादर करत आहेत. सातत्याने भाजपाचे आमदार नितेश राणे हे मुस्लीम धर्माच्या भावनांना ठेच पोहचविण्याचे काम जाणीवपुर्वक करत आहेत. काल-परवा त्यांनी जे वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यात धार्मिकस्थळाचा उच्चार केला. तो संतापजनक. होय, स्वत:च्या धर्माचा स्वाभिमान हा प्रत्येकाला असावा, परंतु दुसर्याच्या धर्माचा अनादर करण्याचा अधिकार इथे कुणालाच नाही. परंतु नितेश राणे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत वाच्चाळवीर असल्याचे दाखवून देतात. शासनकर्ते त्यांना पाठिशी घालतात, त्याचा गैरवापर करत राणे सातत्याने धार्मिक द्वेष पसरवतात. मुख्यमंत्र्यांनी अशा वाच्चाळवीराचां तात्काळ बंदोबस्त करायला हवा. राणेंच्या बेताल बडबडीला भाजपानेही ब्रेक लावायला हवा. नितेश राणे ज्या पद्धतीने बरगळतात ती बडबड ही विखारी असते ती महाराष्ट्राला परवडणारी नाही म्हणून राणेंच्या बोलतींचा बंदोबस्त करा, अशी मागणी शेख तय्यब यांनी मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांकडे केली आहे.