संतप्त जमावाची बसवर दगडफेक ,
गाडी पेटवली, घोडका राजुरीवर शोककळा
घाटसावळी/बीड (रिपोर्टर) परळी-बीड महामार्गावर व्यायाम करणार्या युवकांना एसटी बसने चिरडलेल्या अपघातात तीन तरूण जागीच ठार झाले तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना आज पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास बीड-परळी महामार्गावरील जरूड फाट्याजवळ घडली. हे सर्व तरूण पोलीस भरतीची करत होते. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी जमलेल्या संतप्त जमावाने एसटी बस जाळली. या अपघाताने घोडका राजुरी गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत असे की, पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगत बीड जिल्ह्यातले अनेक तरूण भल्या पहाटे रस्त्यावर धावण्याचा सराव करताना अनेकदा दिसून येतात. बीड -परळी महामार्गावरील जरूड येथील पाच तरूण आज भल्या पहाटे राजुरी फाट्यावर व्यायाम करत होते. त्यावेळी बीडकडून बस क्रमांक एम.एच.14 बी.टी.1473 ही बीड-परभणी एसटी बस परभणीकडे निघाली हेाती. सदरची बस ही राजुरी फाट्यानजिक आली. तेव्हा रस्त्यावर व्यायाम करणार्या सुबोध उर्फ बालू, बाबासाहेब मोरे (20), विराट बब्रुवान घोडके (19), ओम सुग्रीव घोडके (20), आदित्य बळीराम डरफे, आदित्य लक्ष्मण घोडके या पाच तरूणांना बसने चिरडले. यामध्ये सुबोध मोरे, विराट घोडके, ओम घोडके हे तिघे जागीच ठार झाले. तर अन्य दोघांचे दैव बलवत्तर त्यांनी तात्काळ उड्या मारल्याने ते बचावले.
यात दोन्ही आदित्य नावाचे तरूण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की ज्या स्थितीमध्ये हे तरूण चिरडले गेले. त्या स्थितीमध्ये रक्तामासांचा शिंतोडे रस्त्यावर दिसून येत होते. अपघाताची माहिती वार्यासारखी गावात पसरली. तेव्हा गावकर्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तत्पूर्वी अपघात झाल्यानंतर चालकाने बस वळवून आणून ती रस्त्याच्या बाजूला उभी केली. संतापलेल्या जमावाने एसटी बस पेटवून दिली. या जखमींना तात्काळ बीडच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर शवविच्छेदनानंतर तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या हवाली केले. घोडका राजुरी येथील गावकर्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. संतप्त जमावाने बसवर दगडफेक करत तिला पेटवून दिल्यानंतर या महामार्गावरील बससेवा पूर्णत: बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
कसरत करणार्या
तरूणांना आवाहन
शारिरीक तंदुरूस्तीसाठी आणि खास करून पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी बीड जिल्ह्यातले तरूण मोठ्या प्रमाणावर भल्या पहाटे कसरत करताना आणि सरावासाठी धावताना जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या महामार्गासह रस्त्यावर दिसून येतात. जिल्ह्यातले बहुतांशी महामार्ग हे वन वे झाले आहेत. ज्या गावच्या कडेवरून हा माहामार्ग गेला आहे खास करून तेथील तरूण महामार्गावर धावताना अथवा कसरत करताना हमखास दिसतात. सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना कसरत करणार्यांकडे नसतात तेव्हा तरूणांना जीव महत्वाचा आहे. आपण जेव्हा कसरत करतो तेव्हा पायातील बुट, पॅन्ट अथवा टी शर्टवर रिफ्लेक्टर्स लावावे आणि शक्यतो महामार्गावर कसरत न करता एखाद्या मैदानात कसरत करावी.










