बीड (रिपोर्टर): संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी संबंध असलेल्या कळंबमधील महिलेचा मृतदेह चार दिवसांपूर्वी सडलेल्या अवस्थेत सापडला होता. याप्रकरणी आता बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन मारेकर्यांना ताब्यात घेतले आहे. रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद अशी या दोन आरोपींची नावे आहेत. कळंब पोलिसांत या दोघांविरोधात पहाटे पाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपी बीड जिल्ह्यातील केज येथील असल्याचे समजते.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मनीषा बिडवे या महिलेचा वापर केला जाणारा असल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खटला न्यायालयात सुरु झाला असताना या महिलेची हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. अशातच बीड पोलिसांनी या महिलेचा मृतदेह कुजल्यामुळे घरातच या महिलेचे शवविच्छेदन केले होते. त्यानंतर या महिलेचे अंत्यसंस्कारही झटपट उरकण्यात आले होते. या सगळ्यामुळे बीड पोलिसांभोवती पुन्हा एका संशयाचे धुके निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी महिलेच्या दोन मारकेर्यांना केलेली अटक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. आता या दोन्ही आरोपींच्या चौकशीतून महिलेच्या मृत्यूबाबत कोणती नवी माहिती समोर येणार, हे पाहावे लागेल. शवविच्छेदन अहवालात या महिलेच्या डोक्यावर मारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे आता या महिलेच्या हत्येचा घटनाक्रम आणि नेमके कारण समोर येण्याची वाट पाहिली जात आहे. याबाबत आता बीड पोलीस काय माहिती देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.










