आरोपी विरोधात मकोका लावा

बीड, (रिपोर्टर)ः- छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या केली असून या प्रकरणातील आरोपी विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने आक्रोश न्याय आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
गेल्या काही दिवसापुर्वी केएसके महाविद्यालयात शिक्षण घेणार्या साक्षी कांबळे या विद्यार्थींने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेने राज्यात पुन्हा खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची सर्व स्तरातून मागणी केली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साक्षीच्या आईने लेखी पत्र देखिल पाठविले आहे. काल उपसभापती निलम गोर्हे यांनी साक्षी कांबळे यांच्या घरी जावून त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन केले. आज ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश न्याय आंदोलन करण्यात आले. सदरील हे आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी विरोधात मोक्का लावण्यात यावा, बीडमधील रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यावा, साक्षीच्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.






