तहसीलने आज पुन्हा लिलाव पुढे ढकलला
उलटसुलट चर्चेला उधान

बीड, (रिपोर्टर)ः-अवैध रित्या वाळू उपसा करतांना व वाहतुक तरतांना जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव तहसील प्रशासनाकडून करण्याचे योजिले. मात्र गेल्या महिनाभरात दोन वेळा तारीख देऊनही हा लिलाव पुढे ढकलल्याने उलटसुलट चर्चेला उधान आले आहे. तब्बल 41 ट्रॅक्टर आणि पाच जेसीबींबाबत हा लिलाव होणार होता मात्र आज पुन्हा सदरचा लिलाव पुढे ढकलण्यात आल्याचे तहसीलदार यांच्याकडून सांगण्यात आले.
गेवराई तहसीलच्या हद्दीत गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळुचा उपसा केला जातो. गेल्या अनेक दिवसात पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या वतीने अवैध वाळू व उपसा वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई करत ते जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये सुमारे 41 ट्रॅक्टर आणि पाच जेसीबी ज्या अशा आहेत की, त्यांचे मालक ते ताब्यात घेण्याबाबत स्वारस्य नसल्याचे निदर्शनास असल्यामुळे गेवराई तहसीलने ही सर्व वाहने लिलावात काढण्याचे ठरवले. 5 एप्रिल रोजी तसे नोटीफिकेशन काढून 24 एप्रिल रोजी लिलाव होणार असल्याचे घोषीत केले.
त्यानुसार 5 हजार रुपयांची बोली रक्कम अनेकांनी भरली. मात्र 23 तारखेला तहसील प्रशासनाकडून तहसीलदार यांना न्यायालयीन कामकाज असल्यामुळे 24 तारखेचा लिलाव पुढे 26 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता होणार असल्याचे सांगितले मात्र आज पुन्हा अचानक हा लिलाव रद्द करण्यात आला. तहसील प्रशासनाकडून लिलाव का रद्द करण्यात आला हे अद्याप सांगण्यात आले नाही. मात्र तहसीलच्या या भूमिकेने उलटसुलट चर्चेला उधान आले आहे.





