चार तासांपेक्षा अधिक काळ रस्ता रोको, वाहतूक ठप्प
पिडित दिवटेंना जलदगतीने न्याय द्या, जिल्ह्यातील गुन्हेगारी संपुष्टात आणा
परळी (रिपोर्टर): परळी तालुक्यातील लिंबोटा येथील रहिवासी शिवराज दिवटे या तरुणावर झालेल्या अमानूष हल्ल्याच्या निषेधार्थ आज पहाटे सकाळी सहा वाजल्यापासून परळी-बीड मार्गावरील लिंबोटा (गोपीनाथगड) येथील संत भगवानबाबा चौकात गावकर्यांनी रस्ता रोको आंदोलन छेडले. भल्या सकाळीच गावकरी रस्त्यावर उतरल्याने बीड-परळी महामार्गावर वाहतूक पुर्णत: ठप्प झाली होती. तीन तासांपेक्षा अधिक काळ हा रस्ता रोको करण्यात आला. दिवटेला मारहाण करणार्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करत जलदगतीने न्याय द्यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांची होती. दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही या वेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
परळी तालुक्यातील लिंबोटा येथील शिवराज नारायण दिवटे या तरुणाचे अपहरण करत टोकवाडीच्या जंगलात त्याच्यावर काही तरुणांनी हल्ला चढवला. लाठ्या-काठ्या, रॉडने बेदम मारहाण केली. त्याचा व्हिडीओ काढून तो व्हायरल केला. या घटनेने जिल्हाभरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करावी, या प्रमुख मागणीसह अन्य काही मागण्यांसाठी लिंबोटा येथील गावकर्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास गावकर्यांनी बीड-परळी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले. तब्बल तीन तासांच्या आंदोलनाने या महामार्गावरची पुर्ण वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकरणातील आरोपींवर कठोर करावाई करावी, मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करावा, दिवटे यांना जलदगतीने न्याय द्यावा, या प्रमुख मागण्या घेऊन गावकरी रस्त्यावर उतरले होते. गावकर्यांचा संताप पाहता पोलीस प्रशासनाने घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या मोर्चात वाल्मिक कराड सहभागी झाले होते.
तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढत चालली आहे, मारहाण करतात, व्हिडिओ बनवतात आणि दहशत निर्माण करतात अशा तरुणांना, गुंडांना त्यांची जागा प्रशासनाने दाखवावी, अशी मागणी कराड यांनी या वेळी केली.
उद्या परळी बंदचे आवाहन
शिवराज दिवटे हल्ला प्रकरणाचे तीव्र पडसाद आता जिल्हाभरात उमटताना दिसून येत आहेत. आज लिंबोटा येथील गावकर्यांनी रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर परळीकरांनी या घटनेचा निषेध म्हणून उद्या परळी बंदची हाक दिली आहे. त्यापाठोपाठ बीड जिल्हा बंदचेही आवाहन करण्यात आले असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत.
खासदारांनी घेतली शिवराज दिवटेंची भेट
शिवराज दिवटे यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज खा. बजरंग सोनवणे यांनी रुग्णालयात जात शिवराज यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्याचबरोबर त्यांचे वडील नारायण दिवटे यांच्याशी चर्चा केली. या भागामध्ये गुंडगिरी वाढत असल्याचे सांगून त्याला आळा घालण्यासाठी आयपीएस दर्जाचा एक स्वतंत्र अधिकारी व त्याच्या हाताखाली काही कर्मचारी अशी टीम नेमावी व जिल्ह्यातील गुंडगिरी मोडीत काढावी, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी म्हटले.