
माऊली महाराजांच्या समाधीशी लाखो भाविक लीन, ज्ञानोबा-तुकाराम, हरहर महादेवचा गजर
चाकरवाडीत भक्तांचा मेळा, लाखो भाविक माऊली महाराजांच्या समाधीशी लीन
हरी कीर्तनाला लाखोंची उपस्थिती, शिवमहापुरान कथेचे आज दुसरे पुष्प

बीड-केज महामार्गावर वाहतूक ठप्प
बीड (रिपोर्टर): श्रीक्षेत्र चाकरवाडी येथील विसाव्या शतकातील महान संत विभूती वै. ज्ञानेश्वरदादा माऊली यांच्या रौप्यमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजीत अखंड हरिनाम सप्ताहा आणि महाशिवपुरान कार्यक्रमासाठी अखंड महाराष्ट्रातील भक्तगण चाकरवाडीत डेरेदाखल झाले आहेत. सोहळ्याच्या दुसर्या दिवशी श्रीक्षेत्र चाकरवाडीत भक्तांचा मेळा फुलल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जणू मिनी कुंभमेळा भरलाय. यासाठी तब्बल सहा ते आठ कि.मी.चा पायपिटा करत भक्तगण माऊली महाराजांच्या समाधीस्थळी लीन होण्यासाठी चाकरवाडीकडे कूच करताना दिसून येत आहेत. मुखी हरिनाम, ज्ञानोबा तुकारामांचा गजर, हर हर महादेवचा निनाद करत भक्तगण तल्लीन होताना दिसत अहेत.

अखंड हरिनाम सप्ताह आणि शिव महापुरान कथेचे दुसरे पुष्प आज दुपारी एक वाजल्यापासून कथाकार प्रदीपजी मिश्रा हे गुंफत आहेत. तत्पूर्वी रात्री ह.भ.प. बोधले महाराज यांचे हरीकीर्तन झाले. आज सकाळी चाकरवाडी भक्तांनी तुडूंब भरल्याचे चित्र दिसून येत आहे. येळंब फाटा इथपासून लोक चाकरवाडीकडे पायी चालताना दिसून येत होते. जिकडे तिकडे माणसेच माणसे जणू भक्तीचा मळा चाकरवाडीत फुलल्याचे दिसून येत आहे. ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर हे कार्यक्रमाच्या व्यवस्थापनावर पूर्णत: लक्ष ठेवून आहेत. भावीक-भक्त स्वत:हून येणार्या भक्तगणांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून काम करताना पहावयास मिळत आहे. शिव महापुरान कथाकार प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेचा आज दुसरा दिवस आहे. ही कथा ऐकण्यासाठी राज्यभरातून भाविक चाकरवाडीत डेरेदाखल झाले आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही ज्ञानोबा तुकारामांच्या आणि हर हर महादेवाच्या गजराने चाकरवाडी दणाणून गेली.








