
रक्कम परत न मिळाल्याने धक्कादायक पाऊल ; चेअरमन संतोष भंडारी यांच्यावर गुन्हा दा
गेवराई (रिपोर्टर) शहरातील छत्रपती मल्टीस्टेट पतसंस्थेच्या गेवराई शाखेसमोर बुधवारी पहाटेच्या सुमारास एका ठेवीदाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. रक्कम परत न मिळाल्याच्या मानसिक तणावातून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. आत्महत्या केलेल्या ठेवीदाराचे नाव सुरेश आसाराम जाधव (वय 46, रा. खळेगाव, ह.मु. गणेशनगर, गेवराई) असे आहे. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून मृतकाच्या नातेवाईकांनी संतप्त भूमिका घेतली.
फिर्यादी कविता सुरेश जाधव (वय 35) यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव कुटुंबीयांनी 2020 पासून मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या शेती व्यवसायातील बचतीतून छत्रपती मल्टीस्टेटच्या गेवराई शाखेत एकूण 11 लाख 50 हजार रुपये मुदत ठेव म्हणून ठेवले होते. मात्र, गेली दोन वर्षे वारंवार मागणी करूनही संस्थेकडून पैसे परत मिळत नव्हते.
मागील सहा महिन्यांपूर्वीही सुरेश जाधव यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, तेव्हा चेअरमन संतोष उर्फ नाना भंडारी यांनी दोन लाख पन्नास हजार रुपये परत केले व उर्वरित रक्कम दोन महिन्यात देण्याचे आश्वासन दिले होते. पण उर्वरित रक्कम न मिळाल्यामुळे सुरेश जाधव हे सतत तणावात होते. याच तणावातून त्यांनी बँकेच्या दारातच आपले जीवन संपवले.
घटनेनंतर नातेवाईक व नागरिकांनी संतप्त भूमिका घेत, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. जोपर्यंत चेअरमन संतोष भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे पोलिस ठाण्यात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करत चेअरमन संतोष भंडारी यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
शेवटच्या दिवशी घडलेली
घटना – मन हेलावून टाकणारी
17 जून रोजी दिवसभर जाधव कुटुंबीय गेवराई शाखेत रक्कम मागण्यासाठी गेले होते. मात्र, मॅनेजर ज्योती क्षीरसागर यांनी रक्कम न देता सुरेश जाधव यांना अर्वाच्य भाषेत बोलून शाखेतून हाकलून दिले, असा आरोप करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत कुटुंबीय शाखेसमोरच थांबले होते. त्यानंतर सुरेश जाधव हे आपल्या दोन मुलांसह घरी गेले. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांनी शाखेच्या मुख्य दरवाज्यासमोर गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी मन सुन्न करणारा व्हॉट्सअॅप मेसेज
गळफास घेण्यापूर्वी सुरेश जाधव यांनी शाखा व्यवस्थापकांना व्हॉट्सअॅपवर एक संदेश पाठवला होता. त्यामध्ये त्यांनी लिहिले की, माझ्या मुलांच्या शिक्षणाचे तुम्ही वाटोळे केल्याबद्दल धन्यवाद. एवढा अंत एखाद्याचा बघू नये. वेळोवेळी पैसे मागवूनही दिले नाहीत, म्हणून मी तुमच्यासमोर आत्महत्या करत आहे. याचा निरोप चेअरमन संतोष भंडारी व भंडारी दादा यांना द्या. असा मेसेस त्यांनी केला मध्यरात्री 2 वाजता केला यानंतर गळफास घेतला.









